मुंबई- राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. भाजपच्या गोटात उत्साह आहे. तर दिग्गज नेते भाजप आणि शिवसेनेच्या गळाला लागल्यानं काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निरुत्साह दिसून येतो. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार राज्यभर दौरे करून ’बांधणी’ करत आहेत. मात्र, काँग्रेस अजूनही शांत आहे. यंदाची निवडणूक भाजप-शिवसेनेसाठी वर्चस्वाची, तर काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई आहे.
तिहेरी तलाक आणि जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर देशातील ही पहिली सर्वात मोठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून जनतेचा कल जाणून घेण्याची संधी असेल. कारण या दोन्ही निर्णयांवर देशातील जनता खूश आहे, असा भाजपचा दावा आहे. महाराष्ट्रात भाजपच्या जागा वाढल्या तर हा दावा निश्चितच खरा ठरेल. अन्यथा त्यांनी केलेला दावा फोल ठरेल.
प्रमुख मुद्द्यांवर विरोधकांमध्ये शांतता-लोकसभा निवडणुकांमध्ये झालेल्या पराभवातून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अद्याप सावरलेले नाहीत. या दोन्ही पक्षांतील नेते पक्ष सोडून जात आहेत. दोन्ही पक्षांमध्ये अविश्वासाचं वातावरण पाहायला मिळत आहे. कोण कधी पक्षाला ’रामराम’ करेल हे सांगता येत नाही. अशा परिस्थितीत आपलं अस्तित्व टिकवण्याचं मोठं आव्हान या पक्षांसमोर आहे.
जास्त जागा जिंकण्याचे फडणवीसांसमोर आव्हान-राज्याच्या राजकारणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वर्चस्व वाढलं आहे. गेल्या पाच वर्षांत त्यांनी अनेक दिग्गजांना मागे टाकलं आहे. तर विरोधी पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीला धूळ चारली आहे. विरोधी पक्ष नेते असलेले राधाकृष्ण विखे पाटील यांना भाजपमध्ये सामील करून घेतलं. तर ज्या नेत्यांना भाजपमध्ये सहभागी करून घेता आलं नाही त्यांना शिवसेनेत प्रवेश दिला. फडणवीसांनी काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांच्यासोबत बैठक घेतली, मात्र, त्यांना शिवसेनेत प्रवेश दिला. आता मुख्यमंत्र्यांसमोर मागच्या निवडणुकीपेक्षा यावेळी अधिक जागा जिंकून आणण्याचे आव्हान आहे. गेल्या निवडणुकीत भाजपने 122 जागा जिंकल्या होत्या.