जळगाव,(प्रतिनिधी)- दीपस्तंभ मनोबलचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि आधारस्तंभ स्व.रतनलाल बाफनाजी यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्ताने मनोबल मध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी शिबिर आणि व्याख्यान संपन्न झाले.प्रथम सत्रात अस्थिरोग तपासणी शिबिरात मनोबल प्रकल्पातील दिव्यांग विदयार्थ्यांच्या अस्थिव्यंग अडचणींचे निराकरण व तपासणी करण्यात आली तर द्वितीय सत्रात “शाकाहार आणि शारीरिक व मानसिक स्वास्थ्य“ या विषयावर व्याख्यान संपन्न झाले.
सदर शिबिरात मनोबल प्रकल्पातील दिव्यांग विदयार्थ्यांच्या हाडांची ठिसूळता तपासणी, मोफत सल्ला, हाडांच्या सर्व प्रकारच्या विकारांचे निदान केले गेले.या शिबिराच्या माध्यमातून मोफत औषधोपचार आणि तदनंतर आवश्यकता असल्यास शस्त्रक्रिया देखील करण्यात येणार आहे.सदर शिबिरास डॉ.किशोर पाटील आणि डॉ.रवी महाजन यांचे अनमोल असे सहकार्य लाभले.
डॉ.रेखा महाजन यांनी “शाकाहार आणि शारीरिक व मानसिक स्वास्थ्य “ या विषयावर मनोबलच्या विदयार्थ्यांशी सवांद साधला.जसा आहार तसा विचार या प्रमाणे माणूस जसा आहार घेतो तसेच त्याचे विचार आणि आचार असतात.सात्विक आहार असेल तर माणूस आणि त्याचे विचार हि सात्विक बनतात.आहार आणि मानसिक आरोग्य यांचं जवळच नातं आहे.तुम्ही जे खाता त्याचा थेट परिणाम तुमच्या वागण्या बोलण्यात होतो.योग्य आहाराने तुमचं मन शांत राहण्यास मदत होते.
मनावर येणारा ताण कमी होतो.सात्विक आहाराने शरीरातील ऊर्जेचा समतोल राखला जाऊन सकारात्मक ऊर्जा मिळत राहते त्यामुळे तुमचं मन आणि शरीरावर त्याचे सकारात्मक परिणाम होतात.मांसाहार करणारा व्यक्ती पशुतुल्य व्यवहार करतो.तेव्हा अभक्षण भक्षण करून रोगांना निमंत्रण देण्यापेक्षा शाकाहार घेऊनच निरोगी आणि दीर्घायुषी व्हावे असे प्रतिपादन डॉ.रेखा महाजन यांनी केले
स्व.रतनलाल बाफनाजी यांचे मनोबलच्या दिव्यांग विद्यार्थ्यांवर मनापासून प्रेम होते आणि म्हणूनच मनोबलच्या उभारणीत त्यांनी मोलाचे योगदान दिले.त्यांच्या स्मृतीत हा उपक्रम कायम सुरु राहणार असल्याची भावना यावेळी यजुर्वेंद्र महाजन यांनी व्यक्त केली.या वेळी राजेंद्र पाटील, डॉ.रामचंद्र पाटील ,योगेश सूर्यवंशी उपस्थित होते