मुंबई- काँग्रेस आणि राष्ट्रवादीने कलम 370 हटवण्याच्या निर्णयात राजकारण आणलं, अशी टीका करणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना काँग्रेसनं जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. गृहमंत्र्यांनी कलम 370 रद्द करण्याच्या निर्णयावर काश्मीरमध्ये जाऊन व्याख्यान द्यावं, असं काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले.
मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को सभागृहात अमित शहा यांनी ’कलम 370’वर व्याख्यान दिलं. कलम 370 च्या मुद्द्यावर त्यांनी भाजप आणि केंद्र सरकारची भूमिका मांडली. सरकारने कलम 370 रद्द करण्याच्या घेतलेल्या निर्णयामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीने राजकारण आणलं, अशी टीका शहा यांनी केली. या टीकेला काँग्रेसनं जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ’गृहमंत्र्यांनी कलम 370 रद्द करण्याच्या निर्णयावर काश्मीरमध्ये जाऊन व्याख्यान द्यावं. महाराष्ट्रात कलम 371 आहे. कलम 370 नाही,’ असं काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले. महाराष्ट्रात एवढा विकास केला आहे असं दाखवता, तर देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेतील रथाचे चाक चिखलात का रुतले? त्यावर बोलावे, असं आव्हानही त्यांनी दिलं.