नवी दिल्ली- भारतीय मल्ल दीपक पुनियाची जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेतील ’सुवर्ण’ संधी हुकली आहे. पायाला झालेल्या दुखापतीतून न सावरल्यानं पुनियानं पुरुषांच्या 86 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीतून माघार घेतली आहे. माझ्या डाव्या पायाला अजूनही सूज आहे. मला देशासाठी सुवर्ण पदक जिंकायचं होतं. पण दुर्दैवानं हे घडणार नाही. दुखापतीतून सावरेन असं मला वाटलं होतं, पण तसं झालं नाही, असं दीपकनं ’टाइम्स ऑफ इंडिया. कॉम’ला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत सांगितलं.
नूर-सुलतान येथे पार पडलेल्या 86 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत दीपकनं स्टीफन रीजमुथवर 8-2 अशी मात करत अंतिम फेरीत धडक मारली होती. त्याचा सामना इराणच्या हसन याझदानीशी होणार होता. मात्र, पायाला झालेल्या दुखापतीतून तो सावरला नाही. त्यामुळं त्यानं माघार घेतली आणि त्याची सुवर्ण पदकाची संधी हुकली. ’टाइम्स ऑफ इंडिया. कॉम’ला दिलेल्या मुलाखतीत दीपकनं या वृत्ताला दुजोरा दिला आहे. आता त्याला रौप्य पदकावर समाधान मानावं लागेल. ’स्पर्धेच्या सुरुवातीलाच दुखापतीला सामोरं जावं लागलं. माझ्या डाव्या पायाला अजूनही सूज आहे. मला देशासाठी सुवर्ण पदक जिंकायचं होतं, पण दुर्दैवानं तसं होणार नाही. अंतिम लढतीपर्यंत दुखापतीतून सावरेन असं मला वाटलं होतं. पण तसं झालं नाही, अशी खंत त्यानं बोलून दाखवली. अंतिम लढतीत खेळण्याची इच्छा होती. पण दुखापत ही क्रीडापटूच्या जीवनाचा भाग आहे, असंही तो म्हणाला. दीपकनं यापूर्वीच ऑलिम्पिक प्रवेश निश्चित केला आहे. ’ही माझ्यासाठी गौरवास्पद बाब आहे. टोकियोला जात असल्यानं मी खूपच उत्साहित आहे आणि देशाला मी निराश करणार नाही,’ असा शब्दही त्यानं यावेळी दिला.