जमशेदपूर- झारखंडमधील जमशेदपूरमध्ये अल कायदाचा दहशतवादी कलीमुद्दीन मुजाहिरी याला दहशतवादविरोधी पथकानं अटक केली आहे. अनेक दहशतवादी कारवायांमध्ये तो सामील होता. तीन वर्षांपासून तो फरार होता. एका मदरशात तो राहत होता आणि तरुणांची माथी भडकावण्याचं काम करत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.
’कलीमुद्दीन हा अल कायदा’ या संघटनेचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आहे. त्याला टाटानगर रेल्वे स्थानकावरून अटक करण्यात आली. संघटनेत सामील झालेल्या तरुणांना प्रशिक्षणासाठी पाकिस्तानमध्ये पाठवत होता,’ अशी माहिती अतिरिक्त पोलीस महासंचालक एम. एल. मीणा यांनी दिली.
कलीमुद्दीन जमशेदपूरमध्ये राहत होता. तेथे त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल होते. त्याचे साथीदार मोहम्मद अब्दुल रहमन अली उर्फ हैदर उर्फ कतकी, अब्दुल सामी उर्फ हसन तिहार तुरुंगात कैद आहेत. दहशतवादी संघटनेत तरुणांची भरती करण्यासाठी तो उत्तर प्रदेश, गुजरात, पश्चिम बंगालसह विविध राज्यांत जात होता, अशी माहितीही पोलिसांनी दिली.