पुणे- काँग्रेस-राष्ट्रवादी दरम्यानचं जागा वाटप अखेर जाहीर झालं आहे. पुण्यातील विधानसभेच्या आठपैकी चार जागांवर राष्ट्रवादी लढणार असून तीन जागांवर काँग्रेस लढणार आहे. एक जागा मित्रपक्षाला सोडण्यात आल्याचं राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज जाहीर केलं. पवार यांनी एक जागा मित्र पक्षाला सोडण्यात आल्याचं सांगितल्याने ही जागा मनसे लढणार असल्याची अटकळ बांधण्यात आली आहे.
पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात अजित पवार यांनी ही घोषणा केली. पुण्यातील पर्वती, खडकवासला, हडपसर आणि वडगाव शेरी या चार विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी लढणार आहे. शिवाजीनगर, कसबा आणि कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस लढणार आहे. तर मित्रपक्षाला कोथरूडची जागा सोडण्यात आल्याची घोषणा मित्रपक्षाला देण्यात येणार असल्याचं पवार यांनी सांगितलं. या मेळाव्यात अजित पवार यांनी शिवसेना-भाजपवर जोरदार हल्ला चढवला. युती सरकारने महाराष्ट्राची वाट लावली आहे. 370 कलमावर बोलणारे रोजगारावर, महाराष्ट्रातील शेतकर्यांच्या प्रश्नावर का बोलत नाहीत? असा सवालही त्यांनी केला.