जळगाव : शासनात विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांचे आंदोलन मंगळवारी अवघड वळणावर येऊन ठेपले. न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य सरकारने समिती नेमण्याबाबत अधिसूचना काढूनही एसटी संघटनांनी संप मागे घेतला नाही. अखेर एसटी महामंडळाने कारवाईचा बडगा उगारत राज्यभरातील ४५ आगारांतील ३७६ कर्मचाऱ्यांचे निलंबन केले आहे. त्यात अमळनेर येथील ४ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
एसटी महामंडळाचे कर्मचारी ३ नोव्हेंबरपासून संपावर आहेत. राज्यभरात हा संप सुरू असून त्याची तीव्रता आता वाढली आहे. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे ही संपकऱ्यांची मुख्य मागणी आहे. यामुळे राज्यभरातील २५० आगारांपैकी २४७ हून अधिक आगारांमधील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन मागे घेणार नाही, अशी ठाम भूमिका एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. न्यायालयानेही एसटी कर्मचाऱ्यांना संप मागे घेऊन कामावर हजर होण्याचे निर्देश दिले होते.
निलंबित कर्मचारी
मराठवाडा
नांदेड ५८
लातूर ३१
जालना १६
परभणी १०
औरंगाबाद ०५
विदर्भ
यवतमाळ ५७
भंडारा ३०
वर्धा ४०
नागपूर १८
गडचिरोली १४
चंद्रपूर १४
उत्तर महाराष्ट्र
नाशिक १७
जळगाव ०४
धुळे ०२
दक्षिण-पश्चिम महाराष्ट्र
सांगली ५८
सोलापूर ०२
एकूण ३७६