चाळीसगाव | ३० ऑगस्ट रोजी दरड कोसळल्यामुळे तब्बल अडीच महिन्यांपासून बंद असलेला कन्नड घाट आजपासून पूर्ण क्षमतेने सुरू झाला आहे. कन्नड घाट ७० दिवसांनंतर सज्ज झाला असून यामुळे वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे.
३० ऑगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे घाटात ८ ठिकाणी दरड कोसळली होती. तसेच दरड कोसळून रस्ता पूर्ण खचला होता. त्यामुळे दरी भागात ६० फूट खालपासून वरपर्यंत अशा चार संरक्षण भिंती उभारल्या आहेत. तसेच घाटाच्या पायथ्यापासून ते वर ८ किलोमीटर भागात संपूर्ण डांबरिकरण केले आहे. दरी भागात भराव टाकला आहे. तसेच दोन्ही बाजूने रस्ता रुंदीकरण केला आहे.
घाटाचे काम दिवाळीपर्यंत पूर्ण करण्याचा कंत्राटदारांचा मानस होता. परंतु, घाटातील लहान कामे पूर्ण करूनच पूर्ण क्षमतेने घाट सुरू कसा होईल, याकडे लक्ष देऊन काम पूर्णत्वास नेण्याचे काम केले. कन्नड घाटाच्या दुरुस्तीसाठी शासनाने २१ कोटी रुपये मंजूर केले आहेत. आतापर्यंत १५ कोटी रुपयांची कामे पूर्ण झाली आहेत.
आजपासून घाट सुरू होत असल्याने वाहनधारकांनी काम नवीन असल्यामुळे वाहने हळू चालवावीत. तसेच लवकरच अपूर्ण असलेले डांबरीकरणाचे काम पूर्ण करण्यात येईल. घाटात झालेली दशा पाहता महामार्ग प्राधिकरणातर्फे तातडीने डागडुजीचे काम हाती घेण्यात आले. जेथे दरडी कोसळल्या तेथे संरक्षण भिंती बांधून मजबुतीकरण व डांबरीकरणही केले.