जळगाव : शहरातील शासकीय अजिंठा विश्रामगृहामध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. दरम्यान, यावर माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ही अफवा असल्याचं सांगत अशा अफवा पसरवून भाजप आमदारांच्या बदनामीचा प्रयत्न होत असल्याचा आरोप गिरीश महाजन यांनी केला आहे. तसंच या प्रकरणात तथ्य असेल तर त्याचा तपास करुन सोक्षमोक्ष लावला पाहिजे, असंही महाजन यांनी म्हटलं आहे.
जळगाव जिल्हा बँक निवडणूक प्रक्रियेत सोमवारी अर्ज माघारीचा अंतिम दिवस होता. या निवडणुकीवर भाजपने बहीष्कार टाकल्याने गिरीश महाजन जिल्हा बँकेत अर्ज माघारी घेण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी अंजिठा विश्रामगृहात झालेल्या कथित प्रकरणाच्या चर्चेविषयी आपली भूमिका मांडली.
यावेळी महाजन म्हणाले की, असं कुणाचंही नाव कसं घेतलं जाऊ शकते? सोशल मीडियातून हा विषय मी वाचतो आहे. हे अतिशय गंभीर आहे. विषयाला कुठलेही हातपाय नसताना अशी चर्चा होणे चुकीचं आहे. मी पोलिसांशी, एसपींशी बोललो पण ते म्हणतात कुठेच काहीही नाही आहे. सोशल मीडियावर ही एक अफवा होती. मग याचे नाव घ्या, त्याचे नाव घ्या, औरंगाबादचे कुणी आले, कुणी म्हणते पी.ए. आला, तर कुणी म्हणते आमदार आला. मला वाटते ही बातमी फेक आहे, चुकीची आहे आणि खरी असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे आणि सोक्षमोक्ष झालाच पाहिजे. मात्र, विनाकारण कुणालाही बदनाम करायचे, कुणाचंही नाव सोशल मीडियावर टाकायचे हा प्रकार गंभीर आहे,’ असं महाजन यांनी म्हटलं आहे.