जळगाव : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुक रिंगणातून भाजपच्या सर्वच उमेदवारांनी माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता बँकेवर महाविकास आघाडीचे वर्चस्व राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, भाजपचे नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांनी निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचे जाहीर करत आमचे सर्व उमेदवार हे अर्ज माघारी घेणार असल्याचे स्पष्ट केले.
जिल्हा बँकेसाठी २१ रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारीची सोमवारी शेवटची मुदत होती. २१ जागांसाठी एकूण १४९ उमेदवारी अर्ज होते. मात्र माघारीच्या दिवशी माजी मंत्री गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे, माजी आमदार स्मिता वाघ, माजी खासदार ए.टी.पाटील यांच्यासह सर्वच उमेदवारांनी माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, मागच्या पाच वर्षात चुकीचे कामे झाली. जिल्हा बँकेत ज्यांची सत्ता आहे त्यांचेच सहकारी कारखाने, सहकारी सूतगिरण्या, शैक्षणिक संस्था, उद्योग आहेत. त्यांनीच जिल्हा बँकेकडून आपल्या अशा संस्थांसाठी कर्ज मिळवून घेतले आहे. बँक शेतकऱ्यांसाठी आहे की पदाधिकारींसाठी हेच समजत नाही. या सर्व प्रकाराचा पाठपुरावा करून दूध का दूध और पाणी का पाणी करून समोर आणणार असल्याचे गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले.