सोलापूर : कोरोना लॉकडाऊन आणि इतर नियमांमुळे गेल्या दीड वर्षात पंढरपुरमध्ये मोठ्या यात्रा झालेल्या नाहीत. या काळात कोट्यवधी भाविकांना विठ्ठलाचे दर्शन घेता आले नाही. मात्र, आता विठ्ठल भक्तांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. 20 महिन्यांनंतर आता विठुरायाची पंढरी वारकऱ्यांनी गजबजणार आहे. वारकरी संप्रदायासाठी आषाढी कार्तिकी हा दिवाळी सणाएवढाच महत्वाचा असतो. हीच कार्तिकी यात्रा भरविण्यास जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी परवानगी दिली आहे.
प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी सादर केलेला प्रस्ताव आणि मंदिर समितीने यात्रा भरविण्यास दाखवलेली अनकुलता यामुळे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी कार्तिकी यात्रा भरविण्यास मान्यता दिली आहे. सध्या देशासोबतच राज्यातही कोरोनाचा प्रसार कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोनाचे सर्व नियम आणि अटी पाळून ही यात्रा भरविण्यास दिली परवानगी देण्यात आली. यामुळे वारकरी संप्रदाय आणि विठ्ठल भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. तब्बल दीड वर्षानंतर विठ्ठल भक्तांना विठुरायाचं दर्शन घेता येणार आहे.