मुबई : पेट्रोल आणि डिझेलच्या महागाईचा सामना करणाऱ्या सर्वसामान्यांना दिवाळीपूर्वी काहीसा दिलासा मिळाला आहे. दिवाळीच्या पूर्वसंध्येला मोदी सरकारने पेट्रोल डिझेलवरील एक्साईज ड्युटी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पेट्रोल 5 रुपयांनी तर डिझेल 10 रुपयांनी स्वस्त होणार आहे. आज मध्यरात्रीपासून नवे दर लागू होणार आहेत.
उत्पादन शुल्कातील कपातीबाबत अधिकाऱ्याने सांगितले की, पेट्रोलच्या तुलनेत डिझेलवरील कर दुपटीने कमी करण्यात आलाय. याचा सर्वाधिक फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. रब्बी पिकाचा हंगाम सुरू होत आहे. शेतीच्या कामात वापरलेली उपकरणे प्रामुख्याने डिझेलवर चालतात. अशा परिस्थितीत डिझेलचे दर कमी झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीनं उच्चांक गाठला होता. देशात काही ठिकाणी पेट्रोलचे दर १२० रूपयांच्या पुढे गेले होते. तर डिझेलचे दरही १०० रूपयांच्या पुढे गेले होते. परंतु दिवाळीच्या तोंडावर सरकारनं देशवासीयांना दिलासा देत उत्पादन शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पेट्रोलचे दर हे ५ रूपयांनी तर डिझेलचे दर हे १० रूपयांनी कमी होणार आहेत.