मुंबई : दादरा नगर हवेली लोकसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. येथील पोटनिवडणुकीत शिवसेनेने बाजी मारली आहे. शिवसेनेच्या उमेदवार कलाबेन डेलकर यांनी तब्बल 1,12741 मते मिळवून विजय संपादित केला आहे. तर विरोधात असलेले भाजपचे उमेदवार महेश गावित यांना 63,382 मते मिळाली. या निवडणूक निकालामुळे भाजपला मोठा झटका बसला आहे. दरम्यान, शिवसेनेचा हा महाराष्ट्राबाहेरचा पहिलाच विजय असून या निमित्ताने शिवसेने महाराष्ट्राबाहेर विजयाचं खातं खोललं आहे.
दादरा आणि नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी 22 फेब्रुवारी 2021 रोजी मुंबईत आत्महत्या केली होती. मरिन ड्राईव्ह परिसरात असलेल्या हॉटेलमध्ये खासदार मोहन डेलकर यांचा मृतदेह आढळला होता. मोहन डेलकर यांच्या आत्महत्येनंतर त्यांची जागा रिक्त होती. या जागेवर झालेल्या निवडणुकीत डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर यांनी विजय मिळवला आहे. काही दिवसांपूर्वीच कलाबेन डेलकर यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेत शिवसेनेत प्रवेश केला होता.
लोकसभेच्या दादरा आणि नगर हवेली, हिमाचल प्रदेशातील मंडी आणि मध्यप्रदेशातील खांडवा या तीन जागांसाठी पोटनिवडणूक पार पडली. 30 ऑक्टोबर रोजी मतदान झाले असून आज या सर्व ठिकाणची मतमोजणी होत आहे. यासोबतच आसाममधील पाच, पश्चिम बंगालमधील चार, मध्यप्रदेश, हिमाचल प्रदेश आणि मेघालयातील प्रत्येकी तीन, बिहार, कर्नाटक, राजस्थानमधील प्रत्येकी दोन तर आंध्रप्रदेश, हरियाणा, महाराष्ट्र, मिझोराम आणि तेलंगणातील प्रत्येकी एका जागेसाठी पोटनिवडणूक झाली आहे.