मुंबई: गेल्या दोन महिन्यापूर्वी अफगाणिस्तानातील तणावामुळे सुकामेव्याचे भाव महागले होते. मात्र, ऐन दिवाळीच्या तोंडावर बाजारपेठेत काजू, बदाम, मनुक्यासह सुकामेव्याच्या दरात मोठी घट झाल्याचे पाहायला मिळेल. गेल्या काही महिन्यांत सुकामेव्याचे दर प्रचंड वाढले होते. बदामाचा प्रतिकिलो भाव 1200 रुपयांपर्यंत जाऊन पोहोचला होता. परंतु, घाऊक बाजारपेठेत आता हा दर 600 रुपयांपर्यंत खाली उतरला आहे. त्यामुळे सणासुदीत खरेदीचा लाभ ग्राहकांना मिळणार आहे.
काय आहे बदामाचा भाव?
बदामाचा भाव 1100 रुपयांवरून 680 रुपये किलोवर आला आहे. त्याचबरोबर कॅलिफोर्निया बदामाचा भाव 1120 रुपयांवरून 660 रुपयांवर घसरला आहे.त्याचप्रमाणे ऑस्ट्रेलियन बदामाचे भाव 1140 रुपयांवरून 680 रुपये किलोपर्यंत घसरले आहेत. अफगाणिस्तानच्या बदामाची किंमत 1190 रुपयांवरून 600-700 रुपये किलोवर आली आहे. त्याचबरोबर काजूचा भाव 1000 रुपयांवरून 800 रुपये किलोवर आला आहे. अक्रोडचे दर 1000 रुपये किलोवरून 800 रुपये किलोवर आले आहेत.
दरम्यान,गेल्या दिवाळीतही सुकामेव्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली होती. त्यावेळी काजू 450 रुपये प्रतिकिलो दराने विकला जात होता. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अवघ्या दहा दिवसांमध्ये तब्बल 3700 टन सुकामेव्याची विक्री झाली होती. यामध्ये बदामची विक्री 1480 टन इतकी होती. त्यामुळे अवघ्या दहा दिवसांमध्ये सुकामेव्याच्या विक्रीतून जवळपास 140 कोटींची उलाढाल झाली होती.