मुंबई : राज्यातील चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे अखेर २२ ऑक्टोबरपासून उघडणार असून त्यासाठी राज्य सरकारच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागाने नियमावली जाहीर केली आहे.
कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना राज्य सरकारने बरेच निर्बंध शिथिल केलेले आहेत. मात्र असं असलं तरी सरकारने नाट्यगृह आणि चित्रपटगृह सुरु करण्याची परवानगी दिलेली नव्हती. त्यामुळे यावर अवलंबून असलेल्या कलाकारांचे हाल होत होते. ब्रेक द चेन अंतर्गत चित्रपटगृह आणि नाट्यगृहांना परवानगी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २५ सप्टेंबर दिवशीच्या बैठकीत घेतला होता. टास्क फोर्सशी चर्चा करून, हा निर्णय घेण्यात आला होता. अखेर यासंदर्भाची मोठी घोषणा राज्य सरकार कडून करण्यात आली आहे. यासाठी २२ ऑक्टोबरचा मुहूर्त निवडण्यात आला आहे. दरम्यान, यासाठी नियमांची चौकट घालून देण्यात आली असून नियमांचे पालन न करणाऱ्यांविराधोत नियमानुसार कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
हे असणार नियम
– जिल्हाधिकाऱ्यांशी विचारविनिमय करून निर्णय घ्यावा.
– कलाकार, कर्मचारी वृंद यांनी नियमितपणे तपासणी करावी.
– मास्क, सॅनिटायजरचा करणे आवश्यक.
– प्रेक्षकांना कलाकारांच्या कक्षेत भेटण्यास मज्जाव.
– केशभूषा आणि रंगभूषा करणाऱ्यांनी पीपीई किटस परिधान करणे गरजेचे.
– आरोग्यसेतू अॅप बंधनकारक.
– कलाकारांचे आणि प्रेक्षकांचे लसीकरण पूर्ण असणे आवश्यक.
– ५० टक्क्यांपेक्षा अधिक क्षमतेचा वापर करता येणार नाही.
– आसन व्यवस्थेमध्ये सुरक्षित अंतर राखणे.