मुंबई : गेल्या काही दिवसात राज्यातील अनेक ठिकाणांना मान्सूननं झोडपून काढलं आहे. यावर्षी राज्यात सर्व ठिकाणी सरासरी पेक्षा अधिक पाऊस कोसळला आहे. यानंतर राज्यात मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू झाला आहे. आज हवामान खात्याने आज १२ जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे पुढील काही तासात या १२ जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकणात पावसाचा जोर अधिक असणार आहे.दरम्यान, विदर्भातील काही जिल्ह्यातून मान्सून परतला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पावसाचे शेवटचे काही दिवस उरले आहेत.
यावर्षी जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात राज्यात मान्सूननं दिमाखात आगमन केलं होतं. त्यानंतर जुलै आणि ऑगस्ट महिन्यात मान्सून मंदावल्यानंतर सप्टेंबर महिन्यात राज्यातील अनेक ठिकाणांना मान्सूननं झोडपून काढलं आहे. यावर्षी राज्यात सर्व ठिकाणी सरासरी पेक्षा अधिक पाऊस कोसळला आहे. यानंतर आता राज्यात मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू झाला आहे.
हवामान खात्यानं पुढील दोन दिवस राज्यात काही जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. आज मुंबईसह, पुणे, ठाणे, नाशिक, पालघर, अहमदनगर, सातारा, सांगली कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या बारा जिल्ह्यांना हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे. पुढील काही तासांतच याठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकणात पावसाचा जोर अधिक असणार आहे.
उद्या पुन्हा राज्यात पावसाचा आणखी कमी होणार आहे. उद्या सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रायगड या चारच जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित महाराष्ट्रात उद्या कोरडं हवामान राहणार आहे. त्यानंतर बुधवार पासून राज्यात कुठेही पावसाचा इशारा देण्यात आला नाही. आज विदर्भातील काही जिल्ह्यातून मान्सूनच्या परतीला सुरुवात झाली आहे. पुढील दोन दिवसात संपूर्ण राज्यातून पाऊस गायब होण्याची शक्यता आहे.