जळगाव : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे अपंगत्वाचे प्रमाणपत्र सोशलमीडियावर वायरल होत आहे. दरम्यान, माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांनी हे प्रमाणपत्र प्रसिद्धीमाध्यमांसमोर दाखवल्याने एकच खळबळ उडाली आहे.
एकीकडे सामान्यांना अपंगत्वाच्या प्रमाणपत्र मिळवण्यासाठी रांगेत उभे राहावे लागते तरी देखील त्यांना ते मिळत नाही, मात्र खडसे यांना ते कसे मिळाले याबाबत महाजन यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने खडसे यांना दिनांक 6 सप्टेंबर रोजी ६० टक्के अंपगत्वाचे प्रमाणपत्र दिलेले आहे. खडसेंनी स्पाईनचे ऑपरेशन झाले असल्याचे सांगून हे प्रमाणपत्र मिळवले आहे, असा आरोप महाजन यांनी केला. हे प्रमाणपत्र महाजन यांच्या हातात कसे लागले असा सवाल माध्यमाने विचारला असता त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने हे सर्टिफिकेट पाहायला मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
बीएचआर घोटाळा बाहेर काढल्यामुळं आपल्या मागे ईडीचा ससेमिरा लावला गेल्याचा आरोप खडसेंनी केला होता. तो आरोप महाजनांनी खोडून काढला. ‘ईडीची चौकशी ही चार वर्षांपासून पुण्यातील भोसरीतील जमिनीच्या कथित गैरव्यवहार प्रकरणात सुरू आहे आणि बीएचआर प्रकरण हे आता बाहेर निघाले आहे. त्यामुळे बीएचआर गैरव्यवहार आणि खडसेंच्या ईडी चौकशीचा काडीमात्र संबंध नसल्याचेही महाजन यांनी स्पष्ट केले.