मुंबई : ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोलियम कंपन्यांनी सर्वसामान्यांना पुन्हा एकदा झटका दिला आहे. कंपन्यांनी कमर्शियल सिलेंडर दरात तब्बल 43.5 रुपयांची मोठी वाढ केली आहे. त्यामुळे खाद्यपदार्थांची दुकाने, स्टॉल्स, हॉटेल्स, रेस्टारंट किंवा ढाबे अशा सगळ्यांनाच झळ बसणार आहे. या सगळ्यांकडून खाद्यपदार्थांच्या किंमती वाढवल्या गेल्यास त्याचा अंतिम फटका सामान्य नागरिकांनाच बसणार आहे.
इंडियन ऑईलच्या माहितीनुसार, आता दिल्लीत व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजीसाठी 1736.50 रुपये मोजावे लागतील. यापूर्वी ही किंमत 1693 रुपये इतकी होती. तर कोलकातामध्ये हाच दर 1805 रुपये इतका झाला आहे. आता सरकार घरगुती वापरासाठीच्या एलपीजीच्या दरातही वाढ करणार का, हे पाहावे लागेल.
घरगुती 14. 2 किलो सिलेंडरच्या दरात कोणताही बदल न झाल्याने काहीसा दिलसा देण्यात आला आहे. पेट्रोलियम कंपन्या दर 15 दिवसांनी एलपीजी सिलेंडरच्या किंमतीचा आढावा घेतात.
घरगुती गॅसवर दिलासा –
याआधी सप्टेंबर महिन्यात घरगुती LPG Gas Cylinder च्या दरात 25 रुपयांची वाढ करण्यात आली होती. या वाढीनंतर दिल्लीत 14.2 किलोग्रॅम एलपीजी सिलेंडरचा दर वाढून 884.50 रुपये झाला. याआधी पेट्रोलियम कंपन्यानी 18 ऑगस्ट रोजी गॅस सिलेंडरच्या किमतीत 25 रुपयांची वाढ केली होती. या घरगुती सिलेंडर दरात या महिन्यात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.
जुलै आणि ऑगस्ट महिन्यात गॅस सिलेंडरच्या किमती वाढल्या होत्या. मे आणि जूनमध्ये सिलेंडरच्या दरात कोणतेही बदल करण्यात आले नव्हते. एप्रिलमध्ये सिलेंडरच्या दरात 10 रुपयांची कपात करण्यात आली होती.