नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाचे भाव सातत्याने वाढत असल्याने आता भारतातही त्याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. डिझेलच्या दरात आज सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी वाढ नोंदवण्यात आली. आज डिझेलच्या प्रतिलीटर दरात 25 पैशांची वाढ झाली आहे, तर पेट्रोलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. डिझेलची दरवाढ अशीच सुरु राहिल्यास डिझेलही लवकरच शंभरीपार पोहोचेल.
यापूर्वी रविवारी डिझेलच्या प्रतिलीटर दरात 25 ते 27 पैशांची वाढ झाली होती. शुक्रवारीही डिझेलच्या दरात 22 पैशांची वाढ झाली होती. सध्या मुंबईत प्रतिलीटर पेट्रोलसाठी 107.26 रुपये आणि प्रतिलीटर डिझेलसाठी 96.93 रुपये मोजावे लागत आहेत. तर दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 101.19 आणि 89.32 रुपये इतका आहे.
मध्यंतरी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी सार्वकालिक उच्चांक गाठला होता. त्यामुळे सामान्य नागरिकांना इंधन दरवाढ आणि महागाई अशा दुहेरी समस्येचा सामना करावा लागत आहे. मात्र, गेल्या काही दिवसांत इंधन दरवाढीला ब्रेक लागला होता. त्यामुळे सामान्य नागरिकांना काहीप्रमाणात दिलासा मिळाला होता. मात्र, आता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींनी पुन्हा उलटा प्रवास सुरु केल्याने मोठ्या इंधन दरवाढीचे संकेत मिळू लागले आहेत.
गेल्या चार दिवसांत डिझेल 70 पैशांनी महागले
गेल्या चार दिवसांमध्ये डिझेलचे दर तीनवेळा वाढले आहेत. त्यामुळे डिझेल 70 पैशांनी महागले आहे. भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी 24 सप्टेंबरला डिझेलच्या दरात 20 पैसे, 26 सप्टेंबरला 25 पैसे आणि आज 25 पैशांची वाढ केली होती. तुर्तास पेट्रोलची किंमत स्थिर आहे.