मुंबई : एसबीआयने त्यांच्या सर्व ४६ कोटी ग्राहकांसाठी एक महत्वाची माहिती प्रसिद्ध केली आहे. जर तुमचे खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण एसबीआयने आपल्या ग्राहकांना पॅन कार्ड आधारशी लिंक करून घ्यावे, असे सांगितले आहे. जर एसबीआयच्या ग्राहकांनी हे काम निर्धारित वेळेत केलं नाही, तर त्यांना बँकिंग सेवा मिळणे कठीण होईल, असेही बँकेने म्हटले आहे.
केंद्र सरकारने पॅन कार्ड आधारशी लिंक करणे अनिवार्य केले आहे. सध्या पॅन-आधार लिंक करण्याची मुदत ३० सप्टेंबर ते ३१ मार्च २०२२ पर्यंत वाढवण्यात आली आहे. अशा परिस्थितीत एसबीआयने आपल्या ग्राहकांना शक्य तितक्या लवकर पॅनकार्ड आधारशी जोडण्याचे आवाहन केलं आहे.
पॅनला आधारशी कसं जोडायचं ते जाणून घ्या –
– सर्वप्रथम, आयकर संकेतस्थळाच्या मदतीने, तुमचे पॅन आधारशी जोडलेले आहे की नाही, ते शोधा.
– यासाठी आधी आयकर संकेतस्थळावर जा.
– आधार कार्डवर प्रविष्ट केल्याप्रमाणे नाव, पॅन क्रमांक आणि आधार क्रमांक प्रविष्ट करा.
– आधार कार्डमध्ये जन्माचे वर्ष नमूद असेल, तरच स्क्वेअरवर टिक करा. त्यानंतर कॅप्चा कोड टाका.
– यानंतर लिंक आधारवर क्लिक करा. तुमचे पॅन आधारशी जोडले जाईल.
एसएमएस पाठवूनही करू शकता लिंक
एसएमएसद्वारे पॅनला आधारशी लिंक करता येईल. यासाठी तुम्हाला तुमच्या फोनवर UIDPAN टाईप करावे लागेल. यानंतर, १२-अंकी आधार क्रमांक आणि १०-अंकी पॅन क्रमांक प्रविष्ट करा. आता हा मेसेज ५६७६७८ किंवा ५६१६१ वर पाठवा. तुमचे पॅन आधारशी जोडले जाईल.
निष्क्रिय पॅन कार्ड असे करा चालू
निष्क्रिय पॅन कार्ड पुन्हा सक्रिय केले जाऊ शकते. यासाठी तुम्हाला एक संदेश पाठवावा लागेल. तुम्हाला मेसेज बॉक्समध्ये जाऊन तुमच्या नोंदणीकृत मोबाईलमधून १२ अंकी पॅन टाकावा लागेल. नंतर स्पेस देऊन १० अंकी आधार क्रमांक टाका. त्यानंतर हा संदेश ५६७६७८ किंवा ५६१६१ वर पाठवा.