जळगाव – मराठी नाट्यपरंपरेतील ख्यातनाम लेखक व नाट्यसंमेलनाध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांच्या लेखन कार्यशाळेचे अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद जळगाव जिल्हा शाखा व रोटरी क्लब वतीने आयोजन करण्यात आले आहे. दि. 14 व 15 सप्टेंबर रोजी ही कार्यशाळा होणार असून, जळगाव जिल्ह्यातील उद्योन्मुख लेखकांसाठी ही पर्वणी आहे.
सामाजिक बांधीलकीचे भान ठेवून समाजातील विदारक सत्य प्रभावीपणे मांडणारी शैली असणारे लेखक म्हणून प्रेमानंद गज्वी महाराष्ट्रात प्रसिध्द आहेत. त्यांच्या अनेक लेखांचा शालेय अभ्यासक्रमात समावेश आहे. घोटभर पाणी या एकांकिकेचे 14 भाषांमध्ये अनुवाद आहे. त्यांनी लिहिलेली किरवंत, गांधी आणि आंबेडकर, छावणी, तनमाजोरी, देवनवरी, पांढरा बुधवार, शुध्द बीजापोटी या नाटकांचे लेखन करणारे प्रतिथयश लेखकांची ही कार्यशाळा स्थानिक लेखकांसाठी एक सुवर्णसंधी आहे. संपूर्णतः मोफत असणार्या या कार्यशाळेत तीन स्थानिक लेखकांच्या नाट्यसंहिता व प्रेमानंद गज्वी यांच्या गांधी आंबेडकर या संहितेचे सादरीकरण होणार असून, सादर झालेल्या संहितांवर चर्चा व मान्यवरांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
दोन दिवसीय लेखन कार्यशाळेत आज (दि.14) दुपारी 2 वाजता कार्यशाळेचे गणपती नगर येथील रोटरी हॉलमध्ये उद्घाटन होणार असून, त्यानंतर लगेचच स्थानिक लेखक शरद भालेराव यांच्या ‘बोला गांधी उत्तर द्या’ या नाट्यसंहितेचे वाचन होणार आहे. वाचन झाल्यानंतर या नाट्यवाचनावर चर्चा आणि मार्गदर्शन होईल. संध्याकाळी 6 वाजता प्रेमानंद गज्वी यांच्या ‘गांधी आंबेडकर’ या नाट्यसंहितेचे वाचन होऊन रात्री 8 वाजता प्रथम सत्राचा समारोप होईल. दुसर्या दिवाशी रविवारी (दि.15) सकाळच्या सत्रात 9 वाजता भुसावळ येथील लेखक विरेंद्र पाटील यांचे झेंडूचे फुल या संहितेचे वाचन होणार आहे. मान्यवरांच्या मार्गदर्शनानंतर दुपारी 1 वाजता जळगाव येथील अमरसिंह राजपूत यांच्या ‘द फोर्थ वे’ या संहितेचे वाचन होणार आहे. या संहितेवर चर्चा व मार्गदर्शन झाल्यानंतर सायंकाळी 5 वाजता कार्यशाळेचा समारोप करण्यात येईल.
कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी आज (दि.14) सकाळी 10 वाजेपर्यंत नाव नोंदणी करावयाची आहे. जळगाव जिल्ह्यातील नाट्यकर्मींनी कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी प्रविण पांडे 98231 84283, संदीप घोरपडे 94222 79710 आणि शरद भालेराव 70576 17372 यांच्याशी संपर्क साधावा. जास्तीत जास्त नाट्यकर्मींनी या कार्यशाळेत सहभाग घेवून या कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षा सौ.रोहिणीताई खडसे खेवलकर आणि रोटरीचे अध्यक्ष कॅप्टन मोहन कुलकर्णी यांनी केले आहे.