एरंडोल – बुधवारी दुपारी दोन वाजेपासुन सुरु झालेल्या मुसळधार पावसामुळे अंजनी धारण ओव्हरफ्लो झाले.80 टक्के धरण भरत असतांना अंजनी नदी काठावरील हनुमंतखेडे व मजरे या गावांमध्ये पुराचे पाणी शिरले.त्यामुळे ग्रामस्थांनी व पोलीस पाटलांनी तालुका प्रशासनाशी संपर्क साधला असता प्रांताधिकारी विनय गोसावी,तहसीलदार अर्चना खेतमाळीस व पोलीस निरीक्षक अरुण हजारे यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन योग्य त्या उपाय योजना केल्या.प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी बुधवारी रात्रभर जागरण करून हनमंत खेड्याचे ग्रामस्थ जिल्हाधिकारी व अंजनी प्रकल्पाचे अधिकारी यांच्याशी संपर्क साधुन सतर्कता दाखवली.त्यामुळे अंजनी धरण 80 टक्के भरले असतांना रात्री साडे अकरा वाजता अंजनी धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले.
पहाटे चार वाजेपर्यंत पाण्याचा विसर्ग सुरु होता. कासोदा परिसरात 102 मि.मी.अर्थात अतिवृष्टी झाल्याची नोंद करण्यात आली आहे.धुंवाधार पाऊस अंजनी नदीला आलेला पुर व अंजनी धरणाचा पाण्याचा विसर्ग यामुळे हनमंत खेडे,मजरे,सोनबर्डी, नांदखुर्द बु.,नांदखुर्द खु.,एरंडोल या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वित्तहाणी झाली आहे. काही ठिकाणी घरांची पडझड झाली असुन पंचनामे करण्याचे काम सुरु आहे.याशिवाय अंजनी धरणाच्या परिसरातील नदी काठा लगतच्या भागात कासोदा,आडगाव,तळई,फरकांडे,उमरे व इतर गावांमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.अंजनी धरणाला लागुन असलेल्या काळा बांधा-या नजीकच्या शेतामध्ये पाणी प्रवाहीत झाल्यामुळे पिके उध्वस्त झाली आहे. एरंडोल येथे पाच जणांचे प्राण वाचले.जळू जवळील चंदनबर्डी येथील भीमसिंग भुना सोनवणे ( वय 53) हा व्यक्ती सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास शेतात गुरांसाठी चारा घेण्यासाठी गेला असता गावाच्या लगतच्या नाल्यात पुर आल्याने वाहुन गेला.त्याचा मृतदेह एक किलोमीटर अंतरावरील हनुमंतखेडे गावाजवळ झुडुपात सापडला. त्याचे शवविच्छेदन कसोदा प्रा.आरोग्य केंद्रात करण्यात आले.
एरंडोल येथे शासकीय विश्राम गृहा समोरील पवारा आदिवासी लोकांच्या झोपड्या पुरात वाहुन गेल्यामुळे सदर 20 ते 25 परिवार विना निवारा निराधार झालेले आहेत.त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी न.पा.प्रशासन व सेवाभावी संस्था यांनी मदतीचा हात देणे गरजेचे आहे.नगर पालिकेतर्फे सतर्कतेचा इशारा देऊन व काही प्रतिष्ठितांनी प्रत्यक्ष जाऊन या आदिवासी परिवाराला झोपडा पट्टी खाली करण्याच्या सूचना केल्या.यात झोपडपट्ट्या वाहुन गेल्या तर यात प्रेमराज रामसिंग बारेलायांचे कुटुंब पुराच्या पाण्यात अडकले.त्या परिवारातील पाच जन तिन ते चार तास एका काटेरी झाडाचा त्यांनी आधार घेतला.त्यांना दोर टाकुन बाहेर सुरक्षित काढण्यात आले.यावेळी काही युवकांनी व नगर पालिकेच्या कर्मचा-यांनी मदत कार्य केले.मुकेश प्रेमलाल बारेला,दुर्गाबाई प्रेमलाल बारेला,रामाबाई बारेला,प्रेमलाल बारेला तर दुस-या झाडावर सीताराम बारेला हा जीव वाचविण्यासाठी संघर्ष करीत होता.त्यालाही सुरक्षित बाहेर काढण्यात आले.म्हसावद रस्त्यावरील जुन्या फरशीला तडे गेल्यामुळे वाहतुकीसाठी बंद करण्यात आली.स्मशानभूमीची संरक्षक भिंत,कासोदा दरवाज्या नजीकची भिंत,आठवडे बाजारा नजीकची संरक्षक भिंत अंशतः कोसळल्यामुळे हानी झाली आहे.
आठवडे बाजार परिसरातील पुरातन महादेव मंदिराला 40 वर्षानंतर पुराच्या पाण्याने वेढा पडला होता.आठवडे बाजार व बुधवार दरवाज्या समोरचा रस्ता अंजनी नदीचा प्रवाह बनला व त्याच्या काठावर असलेलं मटण मार्केट जवळील घरांमध्ये पाणी घुसून त्यांचे मोठे नुकसान झाले. होता.जवळपास 40 वर्षानंतर अंजनी नदीला मोठा पुर आल्यामुळे बघ्यांची गर्दी झाली होती.गुरुवारी दुपारी अंजनी धरणाच्या तिन पैकी एका गेटची दुरुस्ती करण्यात आली.