मुंबई : साकीनाका बलात्कार प्रकरणामुळे तीव्र संताप व्यक्त होत असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज महिला सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबत महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून वारंवार होणारी मागणी सुद्धा मुख्यमंत्र्यांना मान्य असल्याचं या निर्देशांवरुन दिसत आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हे आपल्या भाषणांमधून, जाहीर सभेतून तसेच पत्रकार परिषदेतून वारंवार परप्रांतियांचा मुद्दा उपस्थित करत होते. परप्रांतीय नागरिकांची नोंदणी ठेवा, कुठल्या राज्यातून आणि कधी याले या संदर्भात माहिती सरकार, पोलिसांना असावी अशी मागणी वारंवार करण्यात येत होती. अखेर हा मुद्दा आता मुख्यमंत्र्यांना पटला असल्याचं दिसून येत आहे. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत.
राज्यातील महिला सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत वरीष्ठ अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक मुख्यमंत्र्यांनी घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी निर्देश देत म्हटलं, गुन्ह्यात रिक्षांचा वापर झाल्याचे निरिक्षण नोंदवण्यात आले. त्यावर रिक्षांच्या अनधिकृत हस्तांतरणाला पायबंद घालण्यात यावा. त्याबाबत नोंदणी करतानाच, स्थानिक पोलिसांकडे माहिती देण्याचे संबंधित परवानाधारकाला बंधनकारक करावे. इतर राज्यातून येणाऱ्यांची नोंद ठेवावी लागेल. ते येतात कुठून जातात कुठे यांची माहिती ठेवावी लागेल.
मुख्यमंत्री ठाकरे यांचे निर्देश…
– गुन्ह्यात रिक्षांचा वापर झाल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले. त्यावर रिक्षांच्या अनधिकृत हस्तांतरणाला पायबंद घालण्यात यावा. त्याबाबत नोंदणी करतानाच स्थानिक पोलिसांकडे माहिती देण्याचे संबंधित परवानाधारकाला बंधनकारक करावे.
– इतर राज्यातून येणाऱ्यांची नोंद ठेवावी लागेल. ते येतात कुठून जातात कुठे यांची माहिती ठेवावी लागेल.
– जलदगती न्यायालयांतून निकाल लागतो पण शिक्षेच्या अमंलबजावणीबाबत आणि पुढील न्यायालयीन प्रक्रियेबाबत सुधारणा करण्याचे प्रयत्न व्हावेत.
– निती आयोगाच्या उद्या (मंगळवारी) होणाऱ्या बैठकीत जलदगती न्यायालयांच्या कार्यप्रणालीत धोरणात्मक सुधारणा करण्याची सूचना करण्यात यावी.
– शक्ती कायद्यातही या अनुषंगाने सुधारणा करण्यावर भर दिला जाईल.
– महिला पोलिसांनी पीडित महिलांशी संवाद साधून, विश्वासाने बोलून माहिती घ्यावी. त्यांच्या छोट्या तक्रारींकडेही दुर्लक्ष होऊ नये.