अहमदाबाद : गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी शनिवारी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली. रुपाणी यांनी अचानक राजीनामा दिल्यानं पुढील मुख्यमंत्री कोण अशी चर्चा सुरू झाली. अशातच भूपेंद्र पटेल हे गुजरातचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. यासंदर्भात पक्षाकडून औपचारिक घोषणा केली जाणार आहे. गुजरात भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक आज गांधीनगरमध्ये झाले. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत एकमताने भूपेंद्र पटेल नेतेपदी निवडले गेले. माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी भूपेंद्र पटेल यांचे नाव सुचवले.
कोण आहेत भूपेंद्र पटेल?
भूपेंद्र पटेल हे गुजरात भाजपामधील ज्येष्ठ नेते आहेत. घाटलोडिया विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. त्यांनी काँग्रेसच्या शशिकांत पटेल यांचा जवळपास १ लाखाहून अधिक मतांनी पराभव केला होता.
विजय रुपानी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांचे नाव आघाडीवर होते. मुख्यमंत्रीपदाचे ते प्रबळ दावेदार मानले जात होते. लोकप्रिय, अनुभवी आणि सर्वांना सोबत घेऊन पुढे जाणारा नेता मुख्यमंत्री व्हावा, असं नितीन पटेल यांनी भाजपच्या विधिमंडळ पक्षाचा बैठकी पूर्वी म्हटलं होतं. मला मुख्यमंत्री केले जाणार, असं मीडिया रिपोर्ट्समधून सांगण्यात येतंय. पण मुख्यमंत्री कोण होणार हे भाजप नेतृत्व ठरवणार आहे, असं नितीन पटेल यांनी बैठकी पूर्वी म्हटलं होतं.