जळगाव : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) २०२० मधील पूर्व परीक्षेचा निकाल अखेर जाहीर करण्यात आला असून या परीक्षेत जळगाव जिल्ह्यातून ४७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर चारवेळा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. ऐनवेळी घेतलेल्या या निर्णयांमुळे उमेदवारांनी राज्यभरात आंदोलन केले होते. त्यानंतर आयोगाने २१ मार्च रोजी पूर्व परीक्षा कोरोनाचे नियम पाळत पार पाडली होती. तिचा निकाल अखेर जाहीर झाला आहे. आयोगाने २०० पदांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गट अ वर्गाची परीक्षा घेतली होती. यात उत्तीर्ण ३ हजार २१४ उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र झाले आहेत.
दरम्यान, या परीक्षेत जळगाव जिल्ह्यातील एकूण ४७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आता मुख्य परीक्षेची प्रतिक्षा आहे. विद्यार्थ्यांची नावे या अधिकृत यादीत पाहू शकता.
खुला प्रवर्ग, ओबीसीचा कटऑफ समान :
राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२० मध्ये खुला प्रवर्ग आणि इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रवर्गाचा कटऑफ समान लागला आहे. एकूण ४०० गुणांच्या पुर्व परीक्षेत दोन्ही प्रवर्गांसाठी सर्वसाधारण कटऑफ २०३.५० गुणांचा आहे. विशेष मागासवर्ग प्रवर्गाचा (एसबीसी) कटऑफही २०३.५ गुणांचा आहे. अनुसूचित जाती (एससी) प्रवर्गाचा १९४.२५ तर अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गाचा कटऑफ १७३.५ गुणांचा आहे.