जळगाव : जिल्ह्यातील विविध भागात मागील दोन तीन दिवसापासून जोरदार पाऊस कोसळत आहे. यात चाळीसगाव, भडगाव आणि पाचोरा या तीन तालुक्यांना अतिवृष्टीचा जोरदार फटका बसला. या तीन तालुक्यातील ३८ गावांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला असून ६७५ घरांची पडझड झाली आहे तर ६६१ जनावरे दगावल्याचा अहवाल निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्रालयाकडे सादर केला आहे.
सोमवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे चाळीसगाव शहरासह वाकडी, वाघडू, हिंगोणे, खेर्डे, मुंदखेडे खुर्द, रोकडे, बोरखेडा खुर्द, पातोंडा, ओझर, टाकळी प्र. चा. ही गावे पुरामुळे बाधित झाली आहेत. चाळीसगाव शहरातील सखल भागातील अंदाजे ५० ते ६० घरांमध्ये पाणी शिरले आहे.
दरम्यान, पुरामुळे चाळीसगाव तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. या तालुक्यातील ३२ गावे बाधित असून, त्याठिकाणी १५५ लहान तर ५०६ मोठ्या पशूंची हानी झाली आहे. एका ६० वर्षीय वृद्धेचा पुरात वाहून गेल्याने मृत्यू झाला आहे. त्याचप्रमाणे ६१७ घरांचे अंशतः नुकसान झाले आहे तर २० घरांची पूर्णपणे पडझड झाली आहे. ३०० दुकानांमध्ये पाणी घूसून नुकसान झाले आहे.
चाळीसगाव तालुक्यासह भडगाव तालुक्यातील २ तर पाचोरा तालुक्यातील ४ गावे पुरामुळे बाधित आहेत. भडगावात १४ घरांची पडझड झाली आहे. पाचोरा तालुक्यातही २४ घरांचे नुकसान झाले आहे. या दोन्ही तालुक्यातील शेतपिकांचे मोठे नुकसान झाले असून, शेतकरी हवालदिल झाले आहेत. चाळीसगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे १५ हजार ९१५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. सादर कलेली आकडेवारी ही प्राथमिक स्वरूपाची असून, सविस्तर माहिती घेण्याचे काम चालू आहे.
हेक्टरी पिकांचे नुकसान
कोरडवाहू ज्वारी – १४३ हेक्टर
बाजरी – २५० हेक्टर
बागायती कापूस – १२ हजार २१५
मका – ३ हजार ५०
इतर पिके – १००
फळपिके -१५०
एकूण – १५ हजार ९१५ हेक्टर