मुंबई : जेष्ठ अभिनेत्री सायरा बानो यांची प्रकृती खालावल्याने त्यांना इस्पितळात भरती करावं लागलं आहे. गेले तीन दिवस त्यांच्यावर मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दिलीप कुमार यांच्या मृत्यूनंतर सायरा यांची प्रकृती खालावली आहे.
अभिनेते दिलीप कुमार यांचं ७ जुलै २०२१ रोजी निधन झालं होतं. दिलीप कुमार यांच्या जाण्याचा धक्का बसल्याने त्यांच्या पत्नी व जेष्ठ अभिनेत्री सायरा बानो यांची प्रकृती खालावल्याची माहिती मिळत आहे.
सायरा यांच्या कुटुंबातील व्यक्तींनी दिलेल्या माहितीनुसार, सायरा यांना दिलीप कुमार यांच्या जाण्याचा मोठा धक्का बसला होता. अजूनही सायरा त्या धक्क्यातून सावरू शकलेल्या नाहीत. सायरा यांचं दिलीप कुमार यांच्यावर असलेलं प्रेम सर्वश्रुत आहे. दिलीप कुमार यांच्या निधनानंतर सायरा यांची प्रकृती खालावत गेली. दिलीप कुमार यांच्या मृत्यूनंतर सायरा कोणासोबतही बोलत नव्हत्या किंवा कुणालाही भेटत नव्हत्या.
वयाच्या १२ व्या वर्षापासूनच सायरा यांना दिलीप कुमार आवडत होते. सायरा आणि दिलीप कुमार यांच्या वयात बरंच अंतर असतानाही सायरा यांनी अखेरपर्यंत दिलीप कुमार यांना साथ दिली. आता त्यांच्या मृत्यूनंतर मात्र सायरा खचून गेल्याने त्याचा परिणाम त्यांच्या प्रकृतीवर दिसू लागला आहे.