मुंबई : फेरीवाल्याच्या हल्ल्यात हाताची बोटे गमावलेल्या महापालिकेच्या अधिकारी कल्पिता पिंपळे यांची आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रुग्णालयात जाऊन भेट घेतली. यावेळी राज ठाकरेंनी कल्पिता पिंपळे यांच्या तब्येतीची विचारपूस केली.
लवकर बरे व्हा…फेरीवाल्यांचं काय ते आम्ही बघू. अधिकृत फेरीवाले आणि अनधिकृत फेरीवाले असे दोन प्रकार आहेत. आंदोलन जे होतं ते अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात होतं. जे काय घडलं त्याचं दु:ख आहेच, पण काळ सोकावतोय. अशाप्रकारची हिम्मत ठेचणं गरजेचं आहे. पोलीस त्यांचं काम करत आहेत, न्यायालयही योग्य न्याय देईल अशी अपेक्षा आहे. पोलिसांनी त्यांची कारवाई केली, त्याला कठोर शिक्षा होईल असं वाटतंय, असं राज ठाकरे म्हणाले.
ठाण्यातील कासारवडवली येथील मुख्य जंक्शनवर अनधिकृत फेरीवाल्यांचा सुळसुळाट आहे. त्याविरोधात महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांनी मोहीम हाती घेतली होती. या फेरीवाल्यांना हटवण्यासाठी गेलेल्या पिंपळे यांच्यावर अमरजीत यादव नावाच्या भाजी विक्रेत्याने धारदार चाकूने अचानक हल्ला केला. त्यात पिंगळे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तसंच, त्यांची तीन बोटंही तुटली. या घटनेचे तीव्र पडसाद उमटत असून फेरीवाल्यांच्या मुजोरीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल मुंबईत बोलताना या घटनेबद्दल संताप व्यक्त केला होता. ज्या दिवशी हा पोलिसांकडून सुटेल, त्या दिवशी आमच्याकडून मार खाईल, असं राज म्हणाले होते. त्यानंतर आज लगेचच राज यांनी ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात जाऊन पिंपळे यांची भेट घेतली व त्यांना धीर दिला. मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई हे देखील यावेळी त्यांच्यासोबत होते.