मुंबई दि.1,- गेले दोन दिवस राज्यात चांगला पाऊस कोसळत आहे. कोकणात गेल्या चार दिवसांपासून संततधार सुरुच आहे. मात्र, काल उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार पाऊस झाला. याचा फटका शेतकऱ्यांना बसला तर जळगाव जिल्ह्यात पुराने मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, येत्या २४ तासांत राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. कोकणातील पालघरमध्ये रेड अलर्ट तर ठाण्यासह उत्तर महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
कन्नड घाट पुढील आठ दिवस बंद…
अनेक ठिकाणी दरडी कोसळून वाहतूक ठप्प झाल्याने वाहतूक विस्कळीत झाले आहे.घाटात वाहतूक मोकळी करण्यासाठी कार्य सुरु असून कन्नड घाट आठ दिवस वाहतुकीसाठी बंद राहणार असल्याचे समजते.
राज्यात पुन्हा पाऊस सक्रीय झाला आहे. दरम्यान, पुढील 24 तासांत राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. पालघरमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर ठाणे आणि उत्तर महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने जारी केला आहे. तसेच आज मध्य महाराष्ट्रात आणि कोकणात मुसळधार पावसाचाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर मराठवाड्यात पावसाने दाणादाण उडवली आहे. 67 महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद आहे. खरीप पिकांचं प्रचंड नुकसान झाले आहे.
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्र राज्यात पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई, कोकणासह मराठवाड्यात बुधवारी मुसळधारांचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला. काही ठिकाणी मुसळधार, तर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने मंगळवारी मराठवाड्यासह अहमदनगर आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागांत हाहाकार उडवला. पुरात सात नागरिकांसह शेकडो जनावरे वाहून गेली. अतिवृष्टीमुळे शेतीचेही नुकसान झाले.