मुंबई : काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय होतं आहे. पुढील तीन ते चार दिवसात महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होईल, अशी शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्राचा उत्तर भाग, कोकणात ठाणे, पालघर आणि मुंबईत जोरदार पाऊस होईल, अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.
आज भारतीय हवामान खात्याकडून, मुंबई, ठाणे, पुण्यासह संपूर्ण विदर्भ, मराठवाडा, दक्षिण महाराष्ट्र आणि कोकणात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याठिकाणी वेगवान वाऱ्याच्या साथीनं जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच उस्मानाबाद आणि लातूर या दोन जिल्ह्यांना आज हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर इतर अनेक जिल्ह्यांत येलो अलर्ट देण्यात आला आहे.
31 ऑगस्टला या जिल्ह्यांना अॅलर्ट
मंगळवारी रायगड, ठाणे आणि नाशिक जिल्ह्यांना ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे. रत्नागिरी, मुंबई, पुणे पालघर, धुळे, नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती आणि नागपूर जिल्ह्यांना यलो अॅलर्ट देण्यात आलाय.
1 सप्टेंबरला राज्यात पालघरला ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला असून मुंबई, ठाणे, रायगड, नाशिक आणि नंदूरबार जिल्ह्यांना यलो अॅलर्ट देण्यात आला आहे.