मुंबई : शिवसेना नेते अनिल परब यांच्या ईडी नोटीसची चर्चा सुरु असतानाच आणखी एका शिवसेना नेत्यावर ईडीने धाडी टाकल्या आहेत. शिवसेनेच्या यवतमाळच्या खासदार भावना गवळी यांच्या 5 संस्थांवर ईडीने धाडी टाकल्या आहे.ईडीच्या अनेक टीम वाशिममध्ये दाखल झाल्या.
ईडीने वाशिम जिल्ह्यातील रिसोड इथे या धाडी टाकल्याचं सांगण्यात येत आहे. रिसोड येथील उत्कर्ष प्रतिष्ठाना, बालाजी सहकारी पार्टीकल बोर्ड, बीएमएस कॉलेज, भावना अॅग्रो प्रोडक्ट सर्व्हिस लिमिटेड या सर्व कंपन्यांवर ईडीने धाडी टाकल्याचं सांगण्यात येत आहे.
किरीट सोमय्यांचा आरोप
शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या बालाजी पार्टीकल बोर्ड कारखान्यावर 100 कोटींच्या घोटाळ्याचे आरोप आहेत. यवतमाळ वाशिमच्या शिवसेना खासदार भावना गवळी यांच्यावर भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी 100 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. बालाजी पार्टीकल बोर्ड कारखान्यामध्ये खासदार भावना गवळी यांनी 100 कोटी रुपयांचा घोटाळा केला, असा आरोप सोमय्या यांनी केला होता.