जळगाव : जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सर्वपक्षीय पॅनल गठीत करण्याबाबत आज (सोमवारी) दुपारी होणाऱ्या बैठकीत निवडणूक बिनविरोध करण्याबाबत चर्चा होणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन या कट्टर प्रतिस्पर्ध्यांसह गुलाबराव पाटील, तसेच माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचीही उपस्थिती या बैठकीला असेल. बऱ्याच दिवसांनी ही नेते मंडळी एकत्र बैठकीला हजेरी लावण्याची चिन्हं आहेत. त्यामुळे ते खरंच हजर राहतील का? याबाबत प्रचंड उत्सुकता आहे.
दुसरीकडे, जिल्हा बँकेसाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे एकत्र लढण्यावर एकमत झाले आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी त्याबाबत पुढाकार घेतला आहे. मात्र, भाजपच्या भूमिकेबाबत साशंकता आहे. महापालिका निवडणुकीत भाजपने शिवसेनेसोबत युतीचे आश्वासन दिले होते. पण ऐन वेळी स्वतंत्र पॅनल रिंगणात उतरवले होते. याचीच भीती आताही आहे. गिरीश महाजन यांची मनधरणी करण्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यशस्वी होतात का? हे देखील आजच्या सर्वपक्षीय बैठकीनंतर स्पष्ट होणार आहे.
जिल्हा बँकांच्या निवडणुका घेण्यास परवानगी
दरम्यान, महाराष्ट्रातील 15 जिल्हा बँकांच्या निवडणुका घेण्यास परवानगी मिळाल्यानंतर सहकार निवडणूक प्राधिकरणाने मतदार याद्या प्रसिद्ध करण्याचा सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे. मात्र त्यावर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचं सावट कायम आहे. या बँकांच्या अंतिम मतदार याद्या 27 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. मात्र मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर किमान एक महिन्याच्या कालावधीनंतर म्हणजेच ऑक्टोबर अखेरीस प्रत्यक्ष निवडणुका होऊ शकणार आहेत.