मुंबई : बॉलिवूडचे स्टार्स म्हटलं की त्यांचे चाहते आले आणि परिणामी गर्दी आली. गर्दीमुळं नेहमीच सेलिब्रिटींच्या सुरक्षेचा प्रश्न उभा असतो. अशा परिस्थितीत त्यांना वाचवण्याचं काम हे कलाकारांचे बॉडीगार्ड करतात. त्यामुळे कलाकारांप्रमाणे त्यांचे बॉडीगार्डही चाहत्यांमध्ये लोकप्रिय होतात. दरम्यान, बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या त्यांच्या बॉडीगार्डचा पगार सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. अमिताभ यांचे बॉडीगार्ड जितेंद्र शिंदे यांचा पगार वाचून तुम्हालाही धक्का बसेल.
अमिताभ बच्चन यांच्या पर्सनल बॉडीगार्डमध्ये अनेक वर्षांपासून त्यांच्यासोबत असलेल्या मराठमोळ्या जितेंद्र शिंदेचं नाव घेतलं जातं. एका वृत्तपत्राच्या माहितीनुसार, जितेंद्र यांना मिळणारा पगार हा एखाद्या डॉक्टर आणि इंजिनिअरपेक्षाही जास्त आहे. जितेंद्र यांना वर्षाचा १ कोटी ५० लाख इतका पगार मिळतो. म्हणजे ते महिन्याला जवळपास १२, लाख ५० हजार रुपये इतका पगार घेत असल्याचं समोर आलं आहे.
हा पगार अभिनेत्री दीपिका आणि अनुष्का शेट्टी यांच्या बॉडीगार्डला मिळणाऱ्या पगारपेक्षाही जास्त आहे. जितेंद्र यांची स्वतःची सुरक्षारक्षक एजन्सी आहे. परंतु, ते स्वतः मात्र अमिताभ यांच्या सोबतच असतात. अमिताभ बच्चन हे सिनेसृष्टीतील अत्यंत मोठे नाव. त्यांचा चाहतावर्गही जबरदस्त आहे. अशावेळी त्यांच्या सुरक्षेची अत्यंत मोठी जबाबदारी जितेंद्र शिंदे यांच्यावर असते. अमेरिकेचा सुप्रसिद्ध अभिनेता आणि निर्माता एलिजा वुड भारतात आला होता त्यावेळी देखील शिंदे यांनी त्यांना सुरक्षा पुरवली होती. अर्थात बिंग बी बच्चन यांच्या सांगण्यावरूनच शिंदे यांनी एलिजा वुडला सुरक्षा दिल्याची माहिती आहे.