जळगाव, (प्रतिनिधी) – येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासह जिल्ह्यातील रुग्णांसाठी देवदूत ठरलेल्या अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या बदलीचे आदेश वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागातर्फे आज गुरुवार 26 ऑगस्ट रोजी काढण्यात आले असून यावेळी राज्यातील दहा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठाता पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात बाबत आदेश काढण्यात आले.
दरम्यान जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांची देखील बदली झाली असून त्यांच्या जागी नागपूर येथील डॉ. मिलिंद फुलपाटील यांचे आदेश पारित झाले आहे.
मात्र डॉ. रामानंद यांनी कोविड काळात अतिशय प्रभावी पणे काम केले असून त्यांच्या कार्यपद्धतिमुळे ते अल्पवाधित लोकप्रिय झाले आहे. रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा मानून डॉ. रामानंद यांनी अहोरात्र रुग्ण सेवा केल्याचे जिल्हावासियांनी पाहिले आहे.
अशात त्यांची बदली झाल्याने बदली रद्द व्हावी अशी भावना जनसामान्यांनी व्यक्त केली आहे.
डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी १३ जून २०२० साली शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगावचा अधिष्ठाता पदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारला होता. साधारण वर्षभरात डॉ. रामानंद यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा चेहराच बदलून टाकला आहे. रुग्णसेवेसाठी तत्परता, आद्यवत सुविधा, रुग्णांची काळजी घेण्यासह अनेक नवीन गोष्टी त्यांनी स्वतः राबून रुग्णांच्या सेवेत आणल्या आहेत.
बदली रद्द व्हावी….
कोविड सारख्या कठीण काळात डॉ. रामानंद यांनी अतिशय प्रभावी काम केले असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला नावलौकिक मिळवून दिला आहे. अजून काही काळ डॉ. रामानंद यांना जळगाव येथे सेवेत ठेवल्यास जिल्ह्याला लाभ होऊन वैद्यकीय सेवेचा दर्जा उंचावण्यात अधिक मदत होईल. त्यामुळे त्यांची सध्यातरी बदली रद्द व्हावी अशीच अपेक्षा सर्वच स्तरातून होतांना दिसत आहे.
यांच्या झाल्या बदल्या….
डॉ. श्रीनिवास शिंत्रे (वसंतराव नाईक महाविद्यालय, यवतमाळ), डॉ. अशोक नितनवरे (शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर), डॉ.भालचंद्र मु-हार (शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, उस्मानाबाद. हे १ ऑक्टोबर रोजी पदभार घेतील), डॉ. भावना सोनवणे (इंदिरा गांधी महाविद्यालय, नागपूर), डॉ. प्रदीप दीक्षित, राजर्षी शाहू महाराज महाविद्यालय, कोल्हापूर, डॉ. अपूर्व पावडे (शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,गोंदिया), डॉ. भास्कर खैरे (स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालय, अंबेजोगाई), डॉ. महेंद्र कुरा (शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अलिबाग), डॉ. विनायक काळे (बी.जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पुणे) यांना कंसात दर्शविलेल्या महाविद्यालयात अधिष्ठाता पदाचा कार्यभार देण्यात आला आहे.