पुणे : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून राजकारण चांगलेच खवळले आहेत. यावरून शिवसेना व महाविकास आघाडी सरकारने भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. भाजपचे सर्व नेते राणे यांच्या पाठीशी उभे राहिले असतानाच, भाजप नेते गिरीश बापट यांनी राणेंना घरचा आहेर दिला आहे. राजकीय पक्षात मतभेद असतात. पण बोलताना पथ्य पाळलं पाहिजे, अशा शब्दात गिरीश बापट यांनी राणेंना घरचा आहेर दिला.
या वादग्रस्त वक्तव्यावरून राणे यांच्याविरुद्ध अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले तर त्यांना अटक करून जामीन मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान, आम्ही नारायण राणेंच्या वक्तव्याचं समर्थन करत नाही. पण भाजप त्यांच्या पाठीशी आहे, असं विधान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. त्यानंतर गिरीश बापट यांनी राणेंना घरचा आहेर दिला आहे.
राजकीय पक्षात मतभेद असतात. पण सर्वच पक्षातील नेत्यांनी बोलताना भाषण करताना काही पथ्य पाळली पाहिजेत. त्यात सर्वच पक्ष आहेत. त्यात मुख्यमंत्री असतील, नारायण राणे असतील यांनी आपआपली मते मांडायला हरकत नाही. पण अनेक गोष्टीत अडचणी दिसतात, मग त्याचं रुपांतर नको त्या गोष्टीत होतं. हे सर्वांनी टाळलं पाहिजे, असं बापट म्हणाले.
सर्वच राजकीय नेत्यांनी बोलताना पाथ्य पाळायला हवं. तसेच सामान्य जनतेला जे आवडतं ते केलं पाहिजे. जनतेत जाऊन कामं केली पाहिजेत, असा सल्लाही त्यांनी दिला.