मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानाखाली मारण्याची भाषा केल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यात आली होती. राणे यांच्या अटकेच्या कारवाईनंतर भाजप नेत्यांनी शिवसेना व महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. भाजपचे सर्व नेते राणे यांच्या पाठीशी उभे राहिले असतानाच, आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राणेंना फोन करून त्यांच्याशी चर्चा केली.
याबाबतची माहिती भाजपा नेते प्रमोद जठार यांनी दिली आहे. यावेळी अमित शाहांनी नारायण राणेंशी चर्चा करत त्यांच्याकडून पोलिसांनी केलेले कारवाई आणि अटकेच्या कारवाईबाबतचे तपशील याबाबत माहिती घेतली. नारायण राणेंच्या अटकेची थेट केंद्रीय गृहमंत्र्यांनी दखल घेतल्याने आता या प्रकरणात भाजपा पुढे काय करणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानाखाली मारण्याची भाषा केल्यानंतर राणे यांच्यावर ठिकठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. गुन्हा दाखल होताच नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी थेट राणेंच्या अटकेचे आदेश काढले. मात्र, केंद्रीय मंत्री असल्यानं राणेंना अटक होईल की नाही याबाबत शंका व्यक्त केली जात होती. खुद्द राणेंनाही तसंच वाटत होतं. आपण नॉर्मल माणूस नसल्याचं वक्तव्यही त्यांनी केलं. मात्र, पोलिसांनी कायद्याच्या आधारे कारवाई करत आधी त्यांना ताब्यात घेतलं व नंतर अटक केली. रात्री उशिरा त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.