नवी दिल्ली – भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्रीपदाची धुरा सांभाळणाऱ्या अरुण जेटली यांनी नव्या मंत्रिमंडळात आपल्यावर कोणत्याही मंत्रीपदाचा कार्यभार सोपवला जाऊ नये अशी विनंती नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. अरुण जेटली यांनी याबाबत नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिले असून आपली शारीरिक स्थिती बरी नसल्याने आपल्यावर तूर्तास तरी कोणत्याही मंत्रीपदाची जबाबदारी सोपवू नये अशी विनंती केली आहे.
अरुण जेटली मागच्या काही काळापासून आजारी आहेत. त्यामुळे ते नव्या मंत्रिमंडळात असणार की, नाही याबद्दल उलट सुलट चर्चा सुरु होत्या. अखेर जेटली यांनीच मंत्रिमंडळात सहभागी होणार नाही हे स्पष्ट करुन चर्चांना पूर्णविराम दिला आहे. २३ मे रोजी लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने सलग दुसऱ्यांदा केंद्रात पूर्ण बहुमत मिळवले.
मागच्या पाच वर्षांपासून तुमच्या नेतृत्वाखालील सरकारचा भाग असणे ही माझ्यासाठी सन्मानाची बाब होती. मला भरपूर काही शिकायला मिळाले. एनडीएच्या पहिल्या सरकारमध्येही पक्षाने माझ्यावर जबाबदारी सोपवली होती. मागच्या दीड वर्षात मला प्रकृती संदर्भातील वेगवेगळया गंभीर समस्यांचा सामना करावा लागला. माझ्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांमुळे मी त्यातून बाहेर येऊ शकलो.
भविष्यात काही काळासाठी मला जबाबदारीपासून दूर ठेवावे. त्यामुळे मला उपचारांवर आणि आरोग्यावर लक्ष केंद्रीत करता येईल असे अरुण जेटली यांनी पत्रात म्हटले आहे. भाजपाप्रणीत एनडीएच्या पहिल्या कार्यकाळात अरुण जेटली यांच्याकडे महत्वाची जबाबदारी होती. केंद्रीय अर्थमंत्री असण्याबरोबरच त्यांनी वेगवेगळया मंत्रालयाची जबाबदारी मोठया कौशल्याने हाताळली.