जळगाव प्रतिनिधी | शासकीय तंत्रनिकेतनमध्ये डिप्लोमाच्या प्रवेशासाठी सातत्याने मुदतवाढ दिली जात आहे. तिसऱ्यांदाही ही मुदत वाढवून आता २० ऑगस्टपर्यंत करण्यात आली आहे. तर अंतिम गुणवत्ता यादी २८ ऑगस्टला जाहीर होणार असल्याची माहिती शासकीय तंत्रनिकेतनचे समन्वयक प्रा. पंकज गडे यांनी दिली.
पॉलेटेक्नीकच्या प्रवेश प्रक्रियेसाठी तंत्रशिक्षण संचालनालयाने २० ऑॅगस्टपर्यत मुदतवाढ केली आहे. दहावीचा निकाल जाहीर होवून २८ दिवस होऊनही विद्यार्थांचा डिप्लोमाकडे फारसा ओढा दिसत नाही. राज्यात काही दिवसांपूर्वी अनेक ठिकाणी आलेल्या महापुरामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याने राज्यभरातील विद्यार्थी व पालकांच्या मागणीची दखल घेऊन तंत्रशिक्षण संचालनालयाने पाॅलिटेक्निक डिप्लोमा प्रथम वर्ष प्रवेश अर्जासाठी पुन्हा मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला होता. आता पुन्हा ही वाढ मिळाली आहे. डिप्लोमासाठी शनिवारपर्यंत ३०६१ विद्यार्थांनी विविध कोर्सेससाठी नोंदणी केली आहे.
सुधारित वेळापत्रक असे
२० ऑगस्ट : ऑनलाइन प्रवेश अर्जाची अंतिम मुदत.
२६ ऑगस्ट : तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर होईल.
२४ ते २६ ऑगस्ट : गुणवत्ता यादीतील त्रुटी व कागदपत्रांची पूर्तता करणे.
२८ ऑगस्ट : अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होईल .