मुंबई : राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरली असताना आता डेल्टा प्लस विषाणूचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. फुप्फुसाच्या गंभीर आजाराचा सामना करीत असलेल्या मुंबईतील एका ज्येष्ठ महिलेचा ‘डेल्टा प्लस’मुळे मृत्यू झाल्याची माहिती गुरुवारी देण्यात आली. त्यानंतर रायगडमध्येही एका रुग्णाचा डेल्टा प्लस विषाणूमुळं मृत्यू झाला आहे. त्यामुळं राज्यातील डेल्टा प्लस विषाणूमुळं मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या तीनवर पोहोचली आहे.
मुंबईतील घाटकोपर परिसरातील ६३ वर्षीय महिलेचा २७ जुलै मृत्यू झाला होता. या महिलेला २१ जुलैला करोनाच्या डेल्टा प्लस विषाणूची लागण झाली होती. या महिलेच्या थुंकीचे नमुने जिनोम सीक्वेन्सिंगसाठी पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल बुधवारी आल्यानंतर पालिकेने तिचा मृत्यू ‘डेल्टा’मुळे झाल्याचे स्पष्ट केले. विशेष म्हणजे या महिलेनं कोव्हिशील्ड लशीच्या दोन्ही मात्रा घेतल्या होत्या.
तर, दुसरीकडे रायगड जिल्ह्यातील नागोठणे परिसरातील ६९ वर्षीय व्यक्तीचा डेल्टा प्लस विषाणूमुळं मृत्यू झाला आहे. रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी ही माहिती दिली आहे. मात्र, या व्यक्तीला करोनाचा संसर्ग कधी झाला होता याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाहीये. १३ जून रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील ८० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. या महिलेला डेल्टा प्लस व्हेरियंटची लागण झाली होती. या महिलेचं लसीकरण झालं नव्हतं. दरम्यान, राज्यात डेल्टा प्लस व्हेरियंटचे ६५ रुग्ण सापडले आहेत.