मुंबई । राज्यात पावसाने दडी मारली आहे. यामुळे बळीराजाचा चालू वर्षाचा खरीप हंगाम पूर्णपणे कोलमडला असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. दरम्यान, मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होणार असून येत्या चार ते पाच दिवसात हलका ते मध्यम पाऊस पडणार अशी माहिती के.एस.होसाळीकर यांनी दिली आहे.
राज्यात गेल्या महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र सह विदर्भ आणि इतर ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. परंतु त्यानंतर पावसाने दडी मारली आहे. एकीकडे राज्यात काही ठिकाणी अतिवृष्टी होत आहे. तर दुसरीकडे जळगाव जिल्ह्यातील काही भागावर दुष्काळाचे संकट निर्माण झाले आहे.
पावसाळा सुरू होऊन दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटला तरी देखील जिल्ह्यात अद्यापही मुसळधार पावसाने हजेरी लावली नाहीय. त्यामुळे पिकांनी मान टाकली आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. जनावरांना चारा देखील मिळत नाहीये. आता पाऊस पडला तरी जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सुटेल. बळीराजाचा चालू वर्षाचा खरीप हंगाम पूर्णपणे कोलमडला असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.