मुंबई प्रतिनिधी : शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. डिमॅट अकाऊंट किंवा ट्रेडिंग अकाऊंट असणाऱ्यांना डिपॉझिटरीकडून (Depositories) 31 जुलैपर्यंत केवायसी डिटेल्स पूर्ण करण्याचा सल्ला दिला होता. मात्र सेबीने अपडेट करण्याचा कालावधी आणखी दोन महिने वाढविण्यात आला आला असून आता 30 सप्टेंबरपर्यंत तुम्हाला डिमॅट आणि ट्रेडिंग अकाऊंट KYC करता येणार आहे. जर कोणत्याही खातेधारकाने नवीन मुदतीपर्यंत केवायसी अपडेट केले नाही, तर त्याचे डीमॅट आणि ट्रेंडिंग खाते बंद केले जाईल.
शेअर बाजारात व्यापार करण्यासाठी खातेधारकांना त्यांचे नाव, पत्ता, पॅन, मोबाईल नंबर, ईमेल आयडी आणि उत्पन्नाची मर्यादा केवायसी अंतर्गत वैध आयडी पुराव्यासह पडताळणी करावी लागेल. एकदा खाते बंद झाल्यावर कोणताही खातेदार शेअर बाजारात व्यापार करू शकणार नाही. एवढेच नाही, जरी एका खातेदाराने एखाद्या कंपनीचे शेअर्स खरेदी केले, तर तो केवायसी तपशील अद्ययावत करेपर्यंत आपला हिस्सा आपल्या खात्यात हस्तांतरित करू शकणार नाही. केवायसी तपशील अपडेट केल्यानंतर त्यांची पडताळणी करणे देखील खूप महत्त्वाचे आहे.
दरम्यान, देशांतर्गत सिक्युरिटीज मार्केटमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांचा सहभाग झपाट्याने वाढला आहे. एप्रिल-जून दरम्यान दरमहा 24.5 लाख डिमॅट खाती उघडली गेली आहेत, असे सेबीचे अध्यक्ष अजय त्यागी म्हणाले होते.
याचबरोबर, देशाच्या सिक्युरिटीज मार्केटमध्ये गुंतवणूकदारांची आवड वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे सध्याचा कमी व्याज दर आणि पुरेशी लिक्विडिटी उपलब्धता आहे, असेही ते म्हणाले होते. तसेच, लिक्विडिटी कमी झाल्यास किंवा व्याजदर वाढल्यास त्याचा परिणाम बाजारावर होऊ शकतो, असा इशाराही त्यांनी दिला होता.