चाळीसगाव प्रतिनिधी : शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असणारा बैलगाडा शर्यतीवरील बंदी राज्य सरकारने त्वरित उठवावी यासाठी आज बुधवारी चाळीसगाव येथे आ. मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
हजारो बैलगाडा चालक मालक, शेकडो शर्यतीचे सर्जा – राजा बैल यांच्या उपस्थितीत या निषेध मोर्चाची सुरुवात कृषी उत्पन्न बाजार समिती येथून स्व.रामराव जिभाऊ पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन करून करण्यात आली. तेथून तितूर नदीवरील नवीन पूल मार्गे तहसील कचेरी हून छत्रपती शिवाजी महाराज चौक, सिग्नल चौक इथपर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. विशेष म्हणजे हजारोंच्या संखेने आंदोलक जमलेले असूनही कुठल्याही प्रकारच्या रहदारीला अडथळा न होऊ देता हा मोर्चा संपन्न झाल्याने शहर वासियांनी देखील आंदोलकांचे कौतुक केले.
दरम्यान, तामिळनाडू व मग कर्नाटक मध्ये याच धर्तीवर कायदा केलेला असून सुद्धा तेथील शर्यतीस माननीय सर्वोच्च न्यायालयाने अद्याप बंदी घातलेली नाही, राज्य शासनाला बियर बार, डान्स बार सुरु करायला वेळ आहे. श्रीमंतांसाठी रेसकोर्सवर घोड्यांच्या शर्यती चालतात मग महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील संस्कृती टिकवणाऱ्या व गोवंश वाढीसाठी प्रोत्साहन देणाऱ्या बैलगाडा शर्यती का खुपतात? असा सवाल करत आमदार मंगेश चव्हाण यांनी चाळीसगाव येथे आयोजित बैलगाडा शर्यंत बंदी विरोधातील निषेध मोर्चात केला.
हे आंदोलन म्हणजे सुरुवात असून येणाऱ्या काळात मुख्यमंत्री यांनी सर्व बैलगाडा चालक मालक संघटनांसोबत बैठक घ्यावी व हा विषय गांभीर्याने घेत सर्वोच्च न्यायालयात तातडीने सुनावणी घेत भूमिका मांडावी अन्यथा राज्यातील सर्व बैलगाडा शर्यत प्रेमी मंत्रालयाच्या आणि मंत्र्यांच्या दावणीला बैल बांधून आंदोलन करतील असा इशारा देखील आमदार चव्हाण यांनी दिला.