पाळधी ता. धरणगाव दिनांक १७ (प्रतिनिधी) : शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून शिवसेनेची ध्येयधोरणे ही समाजापर्यंत पोहचवणे अभिप्रेत आहे. यासाठी शिवसेनेचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी सामान्य माणसाचा विकास केंद्रबिंदू मानून कामे करण्याचे आवाहन शिवसेनेचे उपनेते तथा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. ते येथे आयोजीत शिवसेनेच्या मेळाव्यात पदाधिकारी आणि तालुक्यातील सरपंचांशी संवाद साधतांना बोलत होते.
शिवसंपर्क अभियानाच्या अंतर्गत आज पाळधी येथे पाळधी बांभोरी जिल्हा परिषद गटाचा शिवसेनेचा मेळावा आयोजीत करण्यात आला. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाध्यक्ष विष्णू भंगाळे, महानगराध्यक्ष शरद तायडे…आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, शिवसंपर्क अभियान फेब्रुवारी महिन्यातच जाहीर करण्यात आले होते. मात्र कोरोनाच्या आपत्तीमुळे याला विलंब झाला असून आता ते राबविण्यात येत आहे. जळगाव जिल्ह्यात पारोळा येथून शिवसंपर्क अभियानाची सुरूवात झाली असून आता जिल्हा परिषद गट आणि गणानुसार मेळावे घेण्यात येत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे यांचा २७ जुलै रोजी वाढदिवस असून याच्या पूर्वसंध्येला आपण सर्वांनी शिवसंपर्क अभियान यशस्वी करून त्यांना वाढदिवसाची अनोखी भेट द्यावयाची आहे. प्रत्येक गावाच्या वेशीवर शिवसेनेचा बोर्ड असला पाहिजे. गाव तिथे शाखा आणि शाखा तिथे बोर्ड असलाच पाहिजे. यावर आपण स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून केलेल्या कामांची माहिती ठळकपणे मांडणी गरजेची आहे. शिवसेनेची ध्येयधोरणे ही जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी कोणतेही मतभेद न बाळगता एकजुटीने पक्षबांधणी करावी. सामान्यांचा विकास हा केंद्रबिंदू मानून प्रत्येक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्याने काम करण्याचे आवाहन शिवसेना उपनेते तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी केले.
यावेळी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना सांगितले की, प्रत्येक कार्यकर्त्यांनी मना – मनात शिवसेना व घरा – घरात शिवसैनिक बांधणी करून शिवसेनेचे ध्येय व धोरण जनतेपर्यंत पोहचविण्याचे आवाहन केले. तर जिल्हाप्रमुख विष्णुभाऊ भंगाळे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचे कार्य व विचार तसेच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेले विकास कामे तालुक्यातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहचविण्याचे आवाहन केले. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अधिक बळकट केली असून जिल्ह्याचा विकासाचा ध्यास त्यांनी घेतला असून गुलाबभाऊ म्हणजे विकासाचे महापुरुष असल्याचे गौरवोद्गार काढले. यावेळी तालुका प्रमुख गजानन पाटील, राजेंद्र चव्हाण आदींनी मनोगत व्यक्त केले.
गाव कारभाऱ्यांनी केली शिवसैनिक म्हणून नोंदणी
याप्रसंगी पाळधी – बांभोरी जिल्हा परिषद गटातील सुमारे 15 गावाच्या कारभाऱ्यांनी (सरपंचांनी) पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शिवसैनिक नोंदणी केली. यावेळी त्यांचा सत्कारही करण्यात आला.
यावेळी शिवसेनेचे सह संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हा प्रमुख तथा माजी महापौर विष्णुभाऊ भंगाळे, महानगर प्रमुख शरदआबा तायडे, तालुका प्रमुख गजानन पाटील, राजेंद्र चव्हाण, विधानसभा क्षेत्रप्रमुख संजय पाटील सर, पं.स. सभापती प्रेमराज पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, नगराध्यक्ष निलेश चौधरी, माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे , राजू पाटील, डी.ओ. पाटील, पाळधी सरपंच प्रकाश पाटील, शरद कोळी, चांदसरचे सचिन पवार, सुधाकर पाटील, दिलीपबापू पाटील यांच्यासह पाळधी बांभोरी जिल्हा परिषद गटातील शिवसेना, युवासेना व महिला आघाडीचे पदाधिकारी , सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तसेच वि.का. सोसायटीचे पदाधिकारी उपस्थित होते.
पाळधी – बांभोरी जिल्हा परिषद गटातील पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याचे आयोजन जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील व विभाग प्रमुख सुधाकर पाटील यांनी केले होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविकात विधानसभा क्षेत्रप्रमुख संजय पाटील सर यांनी शिवसंपर्क अभियानाची माहिती विशद केली. सूत्रसंचालन माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे यांनी केले तर आभार जि. प. सदस्य प्रतापराव पाटील यांनी मानले.