२७ जून हा मधुमेह जागृती दिवस होय. जगातील मधुमेहाची राजधानी म्हणून आपला देश ओळखला जातो. त्यामुळे देशात खुप कमी कुटुंब अशी आहेत जिथे हा आजार आढळत नाही. पूर्वीपेक्षा आता या आजाराविषयी बर्यापैकी जागरूकता निर्माण झाली असली तरी काही गोष्टी अश्या आहेत ज्या आज ही सामान्य लोकांना माहीत नाहीत. तर चला अशाच काही बाबी जाणून घेऊया या आजाराविषयी…
निदान
मधुमेहाच्या निदानात उपाशीपोटी (फास्टिंग) आणि खाल्ल्यानंतर दोन तासांनी (पीपी) अशी दोन वेळा साखरेची चाचणी केली जाते. यातील ‘फास्टिंग शुगर’ १२६च्या वर असेल आणि ‘पीपी शुगर’ २००च्या वर असेल तर त्या व्यक्तीस मधुमेह आसल्याचे शिक्कामोर्तब करता येते.
फास्टिंग शुगर’ ११० ते १२६ यामध्ये असेल तर त्याला ‘इम्पेअर्ड फास्टिंग ग्लुकोज’ असे म्हटले जाते, तर ‘पीपी शुगर’ १४० ते २००च्या मध्ये असेल तर त्याला ‘इम्पेअर्ड ग्लुकोज टॉलरन्स’ म्हणतात.
‘इम्पेअर्ड फास्टिंग ग्लुकोज’ आणि ‘इम्पेअर्ड ग्लुकोज टॉलरन्स’ असलेल्या व्यक्तींची रक्तातील साखर मधुमेहाच्या सीमारेषेवर आहे, असे म्हणता येईल. याला ‘प्री-डायबेटिक’ अर्थात मधुमेहापूर्वीची स्थिती असे म्हणतात.
लक्षणं
मधुमेह हा वेदनाविरहित आजार आहे. त्याची लक्षणे रुग्णाला चाचणी न करता ओळखू येण्यासारखी नाहीत. तहान-भूक अधिक लागणे, वारंवार लघवीला जावे लागणे, रात्री उठून लघवीस जावे तसेच रक्तातील साखर खूप वाढू लागली तर कितीही खाल्ले तरी वजन कमी होण्याची लक्षणे दिसू शकतात.
मधुमेहापूर्वीच्या स्थितीत घ्यायची काळजी
नियंत्रित आहार घेणे, रोज किमान अर्धा तास ‘एरोबिक’ प्रकारचा व्यायाम करणे (उदा. सायकल चालवणे, पोहणे, मध्यम गतीने पळणे, चालणे.), ताणतणाव आणि व्यसनांपासून दूर राहणे, दारूप्रमाणेच मांसाहार व धूम्रपानही टाळणे आवश्यक आहे.
रात्री वेळेवर व सलग सात तास झोप घेणे. दुपारी १५-२० मिनिटे विश्रांतीसाठी झोपणे चालू शकेल. दुपारी फार झोपणे आणि सततची बैठी जीवनशैली टाळायला हवी.
घरात इतर कुणाला मधुमेह असो वा नसो, पस्तिशीनंतर रक्तातील साखर तपासून पाहणे चांगले. मधुमेहाची आनुवंशिकता असल्यास अधिक जागरूक राहणे गरजेचे आहे.
मधुमेह झाल्यावर घ्यायची काळजी
योग्य पात्रता असलेला डॉक्टर निवडणे आणि वैद्यकीय सल्ल्याशिवाय स्वत: च्या मनाने प्रयोग न करणे आवश्यक आहे.
गोळ्या घेतल्या म्हणजे मधुमेह फारसा वाढलेला नाही आणि इन्शुलिनचे इंजेक्शन घेतले म्हणजे आजार वाढला आहे, असे तर्क करणेही चुकीचे आहे. रुग्णाला गोळ्या द्यायच्या की इंजेक्शन हे डॉक्टरांना ठरवू द्या. मधुमेहात रक्तातील साखरेचे संतुलन बिघडते. त्यामुळे मधुमेही रुग्णांनी साखर, गूळ, मध, जॅम, जेली, चिक्की, आंब्यासारखी गोड फळे, चॉकलेट असे पदार्थ बंद करायला हवेतच, पण नुसती साखर बंद करून बाकी आहार कधीही व कसाही घेऊन चालत नाही. इतर पदार्थामधूनही साखर व ऊर्जा मिळते. (उदा. पोळी हीदेखील एक प्रकारे साखरच आहे.) आपल्या प्रकृतीप्रमाणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने डायट चार्ट तयार करणे व ते काटेकोरपणे पाळणे आवश्यक आहे.
आहाराच्या वेळा पाळणे गरजेचे. घरातील इतरांचे जेवण झाले नाही म्हणून उशिरा जेवणे, मुळातच घरात उशिरा जेवण्याची सवय असणे, कार्यालयात जेवणाची सुट्टी उशिरा असल्यामुळे जेवणाच्या वेळेत चालढकल होऊ देणे हे मधुमेहींसाठी निश्चितच योग्य नाही. योग्य प्रमाणात व वेळेवर आहार घेतला तर ‘हायपोग्लायसेमिया’ होण्याची म्हणजे रक्तातील साखर एकदम कमी होण्याची शक्यता कमी होते.
मधुमेही रुग्णांच्या पावलांच्या जखमा लवकर बऱ्या होत नाहीत. त्यासाठी पायाची काळजी घेणे आवश्यक आहे. घराबाहेर पडताना पादत्राणे घालून फिरावे.
_डॉ. रोहन केळकर
सहायक प्राध्यापक (औषधवैद्यकशास्त्र विभाग)
शा. वै. म. जळगाव_