पाचोरा, (किशोर रायसाकडा) – येथील दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी विक्री व्यवहार करण्यासाठी येणाऱ्या अभ्यागतांना कोरोना विषयक अँटीजन रिपोर्ट अनिवार्य करण्यात आला आहे. पाचोरा दुय्यम निबंधक कार्यालय परिसरात खोटा कोरोना निगेटिव्ह टेस्ट रिपोर्ट बनवून देणारी टोळी सक्रिय झाली असून पाचोरा नगरपरिषदेने याबाबत चौकशी सुरू केली असल्याचं कळतं तर लवकरच बनावट कोरोना अँटिजेन रिपोर्ट देणाऱ्या टोळीचं पितळ उघडं होईल अशी अपेक्षा व्यक्त होतं आहे.
एक महिन्यापूर्वीच लाच लुचपत विभागाचा सापळा यशस्वी झाल्यानंतर पाचोरा येथील दुय्यम निबंधक कार्यालयाची राज्यभरात नाचक्की झाली होती.पाचोरा खरेदी – विक्री (दुय्यम निबंधक) कार्यालयात नगर परिषदेद्वारा करण्यात येणाऱ्या अँटीजेन टेस्टचे खोटे रिपोर्ट सादर करून खरेदी विक्री व्यवहार केले जात असल्याचा दाट संशय आहे.
याप्रकरणी मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांनी तहसीलदार यांचेशी चर्चा केली असल्याचं समजतं. या बैठकीस पालिका उपमुख्याधिकारी प्रकाश भोसले, दुययम निबंधक श्री गांगोडे उपस्थित असल्याचे कळते.
याप्रकरणी तालुका प्रशासन यंत्रणा व नगरपालिका प्रशासनाला अँटिजेन टेस्ट रिपोर्ट स्लिप मध्ये घोटाळा होत असल्याचे प्रथम दर्शनी निदर्शनास आले आहे. प्रशासनाने संयुक्तरीत्या मागील काही दिवसांपासून च्या व्यवहारांची माहिती संकलित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. या हालचालीची कुणकुण महसूल कार्यालय परिसरात लागल्याने संबंधित खोटे अँटिजेन टेस्ट रिपोर्ट देणाऱ्या टोळीचे धाबे दणाणले आहे.
खोटा अँटीजेन टेस्ट रिपोर्ट प्रकरणी माहिती घेतो तातडीने दखल घेऊन चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल असं प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनी ‘नजरकैद’ शी बोलतांना सांगितले.