यावल प्रतिनिधी( दिपक नेवे)- सध्या कोरोना आजाराने सर्वत्र थैमान घातलेले असून अनेक प्रिय व्यक्ती उपचारादरम्यान आपल्या जवळच्या नातेवाईक-कुटूंबाला सोडून जात मरण पावत आहे. अशा या दुर्दैवी घटनांमुळे अनेक कुटुंबाच्या- कुटुंब उध्वस्त होत आहे. पती-पत्नी पैकी कोणी एक जण जरी दगावला तरी त्या मयत व्यक्तीच्या पश्चात राहिलेल्या परिवाराचे जगणे फारच क्लेशदायक,दुःखदायक व असह्य असे बनत असते. अशीच काहीशी दुर्दैवी घटना नावरे ता.यावल येथील मेढे परिवाराची माहेरवाशिन लेकीची घडली आहे.
याबाबत मयत महिलेच्या कुटुंबियांकडून मिळालेली माहिती अशी की,नांदेड ता धरणगाव येथील सामाजिक कार्यकर्ते गौतम चिंतामण सैंदाणे यांची पत्नी सौ रत्नाबाई गौतम सैंदाणे (वय ५२) या आपल्या माहेरी नावरे ता.यावल येथे दि.८ एप्रिल रोजी आपली आई श्रीमती गिताबाई सुपडू मेढे यांच्या आजारपणात सेवा-श्रृता करण्यासाठी आलेल्या होत्या. मातृत्वाचा वात्सलपूर्ण भावनेतून रत्नाबाई या आपल्या आईची दिवस-रात्र मनापासून सेवा करत होत्या.मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच सुरू होते.
दरम्यानच्या काळात रत्नाबाई सैंदाणे या आजारी पडल्या त्यानंतर तपासणी केली असता त्या कोरोना बाधित असल्याच्या आढळून आल्या. लागलीच त्यांना दि २२ रोजी साकेगाव येथील गोदावरी हॉस्पिटलला उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान पाचव्याच दिवशी म्हणजे दि २७ एप्रिला रोजी सकाळी चार वाजता रत्नाबाई यांची प्राणज्योत मालवली. मयत रत्नाबाई या अगदी कमी वयातच आपल्या कुटुंबाला सोडून गेल्याने संपूर्ण सैंदाणे व मेढे कुटुंबीय शोकाकुल झाले.
मयत रत्नाबाई यांच्या पश्चात पती,दोन मुले, एक मुलगी,आई,दोन बहीणी,दोन भाऊ, जावई,नातवंडे, असा परिवार असून त्या भावा-बहिणी मध्ये सर्वात मोठ्या होत्या. त्यांच्या दुःखद निधनाची घटना कुटूंबियांना चटका लावून गेली. पत्नीच्या अचानक जाण्याने संसाराचा गाडा आता एकट्याने कसा ओढाडायचा ? असा प्रश्न मयत रत्नाबाई यांचे पती गौतम सैंदाणे यांच्यासमोर आहे.मयत रत्नाबाई यांच्या बाबतीत घडलेली घटना अतिशय दुर्दैवी असल्याने माहेरी व सासरी हळहळ व्यक्त केली जात आहे.