कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत राज्यात परिस्थिती चिंताजनक असल्याने या काळात इतर व्यवसाया प्रमाणे हॉटेल व्यावसायिक देखील अडचणीत आल्याने या व्यावसायिकांचा सहानभूती पूर्वक विचार करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहलं आहे.
याबाबत शरद पवार यांनी ट्विट करून माहिती दिली असून त्यांनी म्हटलं आहे की,कोविड-१९ ह्या जागतिक महामारीच्या दुसर्या लाटेने महाराष्ट्रात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोना संक्रमणाची साखळी तोडायची असल्याने पुनश्च संचारबंदीचा निर्णय राज्य शासनाला घ्यावा लागला. याचा परिणाम अनेक व्यवसाय-धंद्यांवर झाला असून हा वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर हॉटेल व्यावसायिक आणि आदरातिथ्य क्षेत्रातील काही प्रतिनिधींनी त्यांच्या समस्यांबाबत मला अवगत केले. त्यांनी प्रामुख्याने मांडलेल्या काही मागण्यांकडे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे एका पत्राद्वारे लक्ष वेधले.
आदरातिथ्य क्षेत्रातील व्यावसायिकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने त्यांच्या मागण्यांचा मुख्यमंत्री सहानुभूतीपूर्वक विचार करतील, तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोनाच्या या संकटातून जनतेला दिलासा मिळेल, हा विश्वास मला आहे.