भुसावळ- रेशन दुकानदाराकडून दरमहा एक हजार 500 रुपयांचा हप्ता मिळण्यासाठी लाच मागणा-या भुसावळ तहसील कार्यालयातील पुरवठा अव्वल कारकुन रवींद्र विनायक तारकर यांना जळगाव एसीबीच्या पथकाने सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास तहसील कार्यालयातून रंगेहाथ अटक केली. या कारवाईने तहसील कार्यालयातील अधिकारी, कर्मचार्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. ही कारवाई जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक गोपाळ ठाकूर यांच्या नेतृत्वात अधिकारी व कर्मचार्यांनी केली.
, रेशन दुकान चालविण्यासाठी दरमहा दीड हजार रुपयांचा हप्ता मिळण्याची मागणी भुसावळ तहसील कार्यालयातील पुरवठा अव्वल कारकुन रवींद्र विनायक तारकर याने एका दुकानदाराकडून केली होती. या संदर्भातील तक्रारीची खात्री होताच जळगाव एसीबीच्या पथकाने सोमवार रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास तहसील कार्यालयात सापळा रचला व लाच स्वीकारतांना रवींद्र तारकर या पुरवठा अव्वल कारकुन यास रंगेहाथ अटक केली. दरम्यान, मागील काही दिवसांपासून रावेर रेशन घोटाळा गाजत असतांना भुसावळ येथे हा प्रकार घडल्यामुळे तहसील कार्यालयातील अधिकारी, कर्मचार्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे .