जळगाव, (प्रतिनिधी)- कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात दिनांक 28 एप्रिल 2021 ते दिनांक 2 मे 2021 या कालावधी मध्ये कोरोना रुग्ण शोधण्यासाठी सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येत असून याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आज दि.24 एप्रिल रोजी काढले आहेत.
जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की,
covid-19 विषाणूंचा प्रादुर्भावमुळे बाधित रुग्णांची लवकर निदान झाले तर त्यांच्यावर लवकर उपचार करता येतील,रुग्णांचे प्राण वाचवता येतील तसेच त्यांचे विलीनीकरण केल्यामुळे त्यांच्यापासून इतर व्यक्तींना होणारा संसर्ग सुद्धा टाळता येईल.
याकरिता covid-19 विषाणूच्या पहिला लाटेमध्ये माझं कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत घरोघरी जाऊन कुटुंबांचे सर्वेक्षण केल्यामुळे व बाधित रुग्णांची विलगीकरण केल्यामुळे पहिल्या टप्प्यातील साथ आटोक्यात आणण्यास या मोहिमेचा प्रभावी उपयोग झालेला आहे. covid-19 ची साथ आटोक्यात आणण्यासाठी नाशिक विभागात दिनांक 28 एप्रिल 2021 ते 2 मे 2021 या कालावधीमध्ये सर्वेक्षण मोहीम राबविण्या बाबत विभागीय आयुक्त नाशिक विभाग नाशिक यांनी सविस्तर सूचना निर्गमित केलेल्या आहेत.
तरी जळगाव जिल्ह्यात दिनांक 28 एप्रिल 2021 ते दिनांक 2 मे 2021 या कालावधी माझं कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम तात्काळ राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
झालेल्या सर्वेक्षणाची माहिती संकलित करण्याची जबाबदारी तालुकास्तरावर तालुका वैद्यकीय अधिकारी व जिल्हा स्तरावर जिल्हा आरोग्य अधिकारी यांची राहील तसेच ‘लवकर निदान लवकर उपचार’ हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असल्यामुळे त्या दृष्टीने आपल्या स्तरावरून आवश्यक ती कारवाई तात्काळ करावे जेणेकरून कोरोनाची लक्षणे असलेल्या सर्व व्यक्ती या सर्वेक्षणांमधून बाहेर येतील आणि त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यास मदत होईल असेही आदेशात नमूद आहे.