जळगाव, (प्रतिनिधी) – राज्यात भारतीय जनता पक्षाचं सरकार असतं तर राज्यातील जनतेला वाऱ्यावर सोडून मंत्रिमंडळ पश्चिम बंगाल मध्ये सतरंज्या उचलायला व अमित शाहांच्या ट्रक ला रस्ता दाखवायला गेलं असतं अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केली आहे.
भाजपा नेते माजी जलसंपदा मंत्री आमदार गिरीश महाजन हे गेल्या काही दिवसांपासून पश्चिम बंगाल निवडणुकीच्या नियोजनसाठी मुक्कामी आहेत तर स्वतः गिरीश महाजन यांनी चार पाच दिवसापूर्वी ट्विट करून केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांच्या ‘रोड शो’ चे नियोजन करतांनाचे व प्रचारात सहभागाचे फोटो शेअर केले होते.दरम्यान आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी भाजपा नेत्यांचं नाव न घेता आज ट्विट करून टीका केली आहेत.
सौ. चाकणकर यांनी ट्विट करून म्हटलं आहे की,भाजपचे अनेक नेते सतत सांगत असतात की जनतेने भाजपचे १०५ आमदार निवडून दिलेत. परंतू त्यातील किती आमदार कोरोनाच्या संकटात आपल्या मतदारसंघात आहेत, किती आमदार पश्चिम बंगालमध्ये सतरंज्या उचलायला गेलेत आणि किती आमदार राज्यपाल भवनाच्या पायऱ्या झिजवताय याबद्दल ते कधीच बोलत नाहीत.
या संकटकाळात राज्यात महाविकास आघाडी सरकार आहे हे आपलं सौभाग्य म्हणावं लागेल, भाजपचं सरकार असतं तर राज्याला कोरोनाच्या संकटात वाऱ्यावर सोडून राज्याचं मंत्रिमंडळ पश्चिम बंगालमध्ये सतरंज्या उचलायला, अमित शहांच्या ट्रक ला रस्ता दाखवायला गेलं असतं अशी घणाघाती टीका त्यांनी यावेळी केली आहे.